झेड प्लस सिक्युरिटी : सीआयएसएफने स्वीकारली सूत्रेनागपूर : अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत आजपासून २४ तास विशेष समूहाच्या ‘झेड प्लस‘ सुरक्षा कवचात राहणार आहेत. त्यांच्यासकट संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) डझनभर अधिकाऱ्यांसह सुमारे १२५ कमांडोचा ताफा मंगळवारी संघ मुख्यालयात दाखल झाला. सरसंघचालक भागवत यांच्यासह नागपुरातील संघ मुख्यालयसुद्धा विविध अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी संघ मुख्यालयावर प्रचंड क्षमतेची स्फोटके घेऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला आहे. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकावर (एसपीयू) सोपविण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या संकेतानुसार, भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना व्हीव्हीआयपी दर्जाची ‘झेड प्लस‘ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतला. त्यांना सीआयएसएफचे सुरक्षा कवच बहाल करण्याचे ठरले. त्यानुसार, मंगळवारी सकाळी सीआयएसएफचे जवान नागपुरात दाखल झाले. आल्याआल्याच त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार, आता भागवत नागपुरात संघ मुख्यालयात असो किंवा देशभर जिथे कुठे दौऱ्यावर जातील, तेथे त्यांच्या सभोवताल सुमारे ६० ते ७० कमांडोंजचा गराडा राहणार आहे. हे सुरक्षा कवच सरसंघचालकांभोवती २४ तास राहणार आहे. तर, तेवढेच कमांडो संघ मुख्यालयाच्या परिसराची सुरक्षा व्यवस्था सांभाळतील. (प्रतिनिधी)अत्याधुनिक शस्त्रे, बुलेटप्रूफ वाहन४अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सीआयएसएफचे कमांडो कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात निष्णात असतात. मंगळवारी दाखल झालेल्या या पथकाकडे एके ४७ / ५६, इन्सांस, एमपी -५ मशीनगनसारखी अत्याधुनिक हत्यारे तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आहे. सध्या त्यांनी दोन विशेष स्कॉर्पिओ येथे आणल्या. भागवत यांच्यासाठी लवकरच बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू कार येणार आहे. महनीय व्यक्तीच्या सुरक्षेसाठी हे कमांडो कोणतीही कृती (संरक्षणाची) करू शकतात. ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना सुरक्षेच्या खातर जागेवरच कोणताही निर्णय घेऊ शकतात. त्यांना त्यासंदर्भात पूर्वपरवानगी घेण्याची गरज नसते. कमांडंटनी स्वीकारली सूत्रे४सरसंघचालक भागवत यांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेचे नेतृत्व डीसीपी दर्जाचे अधिकारी (कमांडंट) अपूर्व पांडे करणार आहेत. आतापर्यंत ही व्यवस्था सांभाळणारे एसआरपीएफचे पथक, पोलीस आणि एसपीयूच्या पथकाला ‘जबाबदारी मुक्त‘ करीत मंगळवारी पांडे यांनी सुरक्षेची सूत्रे हातात घेतली.
सरसंघचालकांभोवती आजपासून विशेष समूहाचे सुरक्षा कवच
By admin | Updated: August 12, 2015 03:26 IST