नागपूर : बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधण्यात येईल. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आ. बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत आ. अजय चौधरी, प्रताप सरनाईक, योगेश सागर, प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, रवींद्र वायकर, अमित देशमुख यांनी भाग घेतला. यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक आहे.
राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद व महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतरवासिता (इंटरशीप) करणेही बंधनकारक आहे.
परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय) माध्यमातून देशात शोधण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने याबाबत नियमात बदल केला असून चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची परीक्षा देण्याची अट नाही. मात्र, अन्य राष्ट्रातून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांना देशात वैद्यकीय व्यवसाय करता येतो, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली.