बोगस बियाणे : कृषी विभागाकडे तक्रारीवरोरा : यंदा खरीप हंगामाच्या प्रारंभापासूनच सोयाबीन बियाण्यांची टंचाई होती. याचा फायदा घेत खासगी कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. आता शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. शेकडो तक्रारीमुळे कृषी विभागही खडबडून जागा झाला असून तज्ज्ञांचे तपासणी पथक तातडीने तक्रारकर्त्यांच्या शेतावर पाठविणे सुरू केले आहे.मागील वर्षी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात सोयाबिनची पेरणी करता आली नाही. ज्यांनी सोयाबिनची पेरणी केली, त्याचे सोयाबीन पिक हाती येत असताना अकाली पाऊस झाला. सोयाबीनची पिके शेतात उभी होती तर काहींनी पिकांची कापणी करुन ठेवली होती. पावसामुळे सोयाबिन शेंगाना बिजांकुर फूटल्याने त्याची प्रतवारी खराब झाली होती. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात सोयाबीनच्या बियाण्यांची मोठी उणीव निर्माण झाली होती. उगवण क्षमता सोयाबीन बियानात कमी असल्याने पेरणीपूर्वीच शेतकरी कमालीचे धस्ताविले होते. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनची उगवण क्षमता घरी तपासून बघण्याची गावागावात व्यापक मोहिम राबवून शेतकऱ्यांना जागृक केले होते. अशातच वरोरा तालुक्यातील कवडापूर, येन्सा, नागरी यासह तालुक्यातील इतर परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र हे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे शेतकरी भयभित झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. कृषी विभागानेही तातडीने दखल घेत तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या शेतावर तज्ज्ञामार्फत पहाणी केली आहे. सोयाबीनची उगवण क्षमता अत्यल्प असल्याने शेतकरी कमालीचे धस्ताविले असल्याचे दिसून येत आहे.पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी तातडीने सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारली. जमिनीमधील ओलाव्याने दाण्यांना अंकुर फूटून जमिनीवर आले. ज्या जमिनीत ओलावा झाला नाही व खतही सोबत देण्यात आल्याने उष्णतेने सोयाबीनच्या दाण्यांना अंकुर फूटला नाही, अशी माहिती आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पी.के. आकोटकर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही
By admin | Updated: July 30, 2014 01:12 IST