नागपूर : कळमना परिसरात रेल्वे रुळाच्या क्लीप काढल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असताना रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. लोहमार्ग पोलिसांनी घटनेपूर्वी रेल्वे रुळावर कोण केले होते याची गुप्तचरांमार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली असून रेल्वे सुरक्षा दलाने संशयित ५५ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.गुरुवारी कळमना परिसरात रेल्वे रुळाच्या 'पेंड्रॉय क्लीप' काढल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली. दरम्यान दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळ लकडगंज पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी या घटनेच्या चौकशीस सुरुवात केली आहे. रेल्वे रुळाच्या 'पेंड्रॉय क्लीप' सलग काढलेल्या नव्हत्या तर त्या तुटक-तुटक काही अंतरावर काढण्यात आल्या होत्या. तर काही क्लीप रेल्वेगाडीच्या कंपनामुळे अध्र्या निघालेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. यामुळे यामागे घातपाताची शंका नसून त्या कंपनामुळे निघाल्या असाव्यात, असा लोहमार्ग पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लोहमार्ग पोलिसांनी घटनेपूर्वी रेल्वे रुळावर कोण गेले होते याचा शोध सुरू केला आहे. यासाठी एका स्वतंत्र चमूचे गठन केले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने याबाबत ५५ संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. परंतु दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त डी. बी. गौर यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी मोबाईल न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
क्लीप कुणी काढल्या?
By admin | Updated: May 10, 2014 01:21 IST