लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : ‘आमचे भिवापूर-स्वच्छ भिवापूर’ असा शंखनाद नगरपंचायत प्रशासन करीत असले तरी, प्रत्यक्षात गल्लीबाेळांत स्वच्छतेचा झाडू फिरविणाऱ्या सफाई कामगारांना विविध समस्या व मागण्यांच्या पूर्ततेअभावी वंचित राहावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे वेतन वा मजुरी मिळाली नाही. दरम्यान, बुधवारी (दि. ६) संतप्त महिला सफाई कामगारांनी नगरपंचायतीत धडक देत थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रेटून धरली.
शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदारावर असून, नगरपंचायत प्रशासनाने घंटागाडी व रस्त्यांची स्वच्छता असे दोन वेगवेगळे कंत्राट संबंधित कंत्राटदारांना दिले आहे. यात शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दैनिक स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या एजन्सीने शहरातील ३० महिला कामगारांना प्रत्येकी १५० रुपये मजुरीप्रमाणे स्वच्छतेच्या कामात लावले आहे. या महिला कामगार दररोज नियमित स्वच्छतेचे कर्तव्य बजावत असल्या तरी गत चार महिन्यांपासून त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आरोग्य, मुलांचे शिक्षण, आदी करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
त्यामुळे थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे. या मागणीसाठी सफाई कामगार महिलांनी बुधवारी सेनेचे तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीवर धडक दिली. यावेळी कार्यालय अधीक्षक दुगदेव तिमांडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिरीष गुप्ता, वृंदा शंभरकर, संघमित्रा भागवतकर, उषा सेनापती, कांचन कलसे, विद्या चहांदे, राखी धनविजय, वैशाली बनकर, लता नागोसे, सुलोचना भागवतकर, प्रतिभा कालरकर, मंगला धनविजय, सुशिला मेश्राम, लतिका मेंढे, मनीषा दास, संगीता भागवतकर, आम्रपाली मेश्राम, अलका कोटंगले, सुशीला धनविजय, वंदना लाऊत्रे, दुर्गा भैसारे, शिला इंदूरकर, मीरा मेश्राम, रविला माटे, सुलोचना गेडाम, उषा नंदागवळी, अनिता पाटील, संध्या विशनुरकर, छाया सहारे, आदी महिला कामगार उपस्थित होत्या.
....
१५० रुपयांत जगायचे कसे?
शहरातील स्वच्छतेसाठी महिला सफाई कामगार गत दोन वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने केवळ १५० रुपये मजुरीने राबत आहेत. कोरोना संसर्ग व लॉकडाऊनच्या काळातही ‘याेद्धा’ बनून या महिलांनी शहराच्या स्वच्छतेसाठी सेवा दिली. त्या बदल्यात मिळणाऱ्या अल्प १५० रुपये मजुरीत जगायचे कसे, या ताेकड्या मजुरीत तुम्हाला तरी जगता येईल काय, असा प्रतिप्रश्न या महिलांनी प्रशासनाला विचारला आहे. कामगार नियमाप्रमाणे या महिला मजुरांना मजुरी, सुविधा, पीएफ कपातीची सुविधाही मिळत नाही, हे विशेष.
...
दोन दिवसांचा अल्टिमेटम
महिला कामगारांचे थकीत वेतन, कामगार नियमाप्रमाणे वेतन वा मजुरीत वाढ, पीएफ कपातीचा प्रश्न येत्या दोन दिवसांत निकाली न निघाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा दोन दिवसांचा अल्टिमेटम महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.