नागपूर : भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेल्या महार रेजिमेंटच्या जवानांचा रविवारी मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता सैनिक दलाच्या वतीने दीक्षाभूमीवर हा भव्य साेहळा पार पडला.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४१ साली महार रेजिमेंटची पुनर्स्थापना करून देश सेवेला समर्पित केले हाेते. तेव्हापासून भारतीय सेनेत देशाचे संरक्षण करण्याचे कार्य ही रेजिमेंट माेठ्या अभिमानाने करीत आहे. या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दीक्षाभूमीवर या समारंभाचे आयाेजन करण्यात आले. सेनेतून निवृत्त झालेल्या रेजिमेंटच्या २० जवानांचा सत्कार करण्यात आला. समता सैनिक दलाने नेहमीप्रमाणे दीक्षाभूमीवर साप्ताहिक परेड केली. यानंतर जवानांसह मिरवणूक काढण्यात आली. सैनिकांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी सैनिकांनी सेनेतील अनुभव मांडले. महार रेजिमेंटमध्ये जाण्यासाठी तरुणांना प्राेत्साहित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर रमाई यांना अभिवादन करण्यात आले.
या आयाेजनात आनंद पिल्लेवान, ॲड. स्मिता कांबळे, विशाल वाघमारे, विश्वास पाटिल, सुनील इंदूरकर, राजेश लांजेवार, घनश्याम फुसे, आनंद तेलंग, दिशू कांबळे, टारझन ढवळे, सुलभ बागडे, ॲड. विवेक इंगळे, सुनील जवादे, प्रज्वल बागडे, अविनाश भैसारे आदी समता सैनिकांचा सहभाग हाेता.