रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरण बदलामुळेही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने रुग्णांची परवड होत आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची सोय आहे. दोन सुविधायुक्त स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आहेत. परंतु येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नागपूर येथील मेडिकल, मेयो किंवा खासगी रुग्णालयात रेफर केले जाते. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. येथील काही डॉक्टरही संक्रमित झाले आहे तर काही डॉक्टर दुसरीकडे प्रतिनियुक्तीवर आहे. अशात येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. यामुळे गरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा कशी मिळेल, हा प्रश्नच आहे.
उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर यांचे पद गत काही वर्षांपासून रिक्त आहे. तसेच मुख्य परिसेविका, सहायक परिसेविका, दोन फार्मासिस्ट, दोन लॅब टेक्निशियन, एक एक्स-रे टेक्निशियन, एक वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, लिपिक इतके पदे रिक्त आहे. येथे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांचे सिझर करायचे असल्यास बालरोग तज्ज्ञांची आवश्यकता आहे. बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे सिझरिंग करणे टाळल्या जाते. फिजिशियन नसल्याने योग्य औषध उपचार रुग्णांना मिळत नाही. जनरल सर्जन नसल्यामुळे महत्त्वाची शस्त्रक्रिया होत नाही. शस्त्रक्रियेसाठी बाहेरून सर्जन बोलवावे लागतात. तसेच अन्य टेक्निशियनचे पद रिक्त असल्याने रुग्णांच्या चाचण्या बरोबर होत नाहीत. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयात काही डॉक्टर आणि टेक्नेशियनची पदे रिक्त आहेत. मात्र आहे त्या मनुष्यबळावर रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.
- डॉ. प्रकाश उजगरे
कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा हव्यात
रामटेक, मौदा, पारशिवनी, कन्हान या परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत येथील कोविड केअर सेंटर बंद करण्यात येऊ नये. यासोबतच आवश्यकता भासल्यास येथे खाटांची संख्या वाढविण्यात यावी आणि रुग्णांना आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी काँग्रसचे महासचिव उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ग्रामीण भागात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकंती होत आहे. इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. याकडे प्रशासनाने कारवाई करण्याची गरज यादव यांनी व्यक्त केली.