सुमेध वाघमारे
नागपूर : रस्त्यावरून जुनी वाहने हटविण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ‘स्क्रॅप पॉलिसी’ची घोषणा केली. या पॉलिसीअंतर्गत २० वर्षे जुन्या खासगी गाड्या आणि १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरवर तपासणीसाठी जावे लागणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती समोर येणार असली तरी अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्र, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये वापरलेली १५ वर्षे जुनी वाहने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण सर्वांसाठी आल्यास नागपूर जिल्ह्यातील खासगी व व्यावसायिक असलेली एकूण ४२,१४५ वाहने भंगारात निघेल.
बहुप्रतीक्षित असलेल्या स्क्रॅप पॉलिसीच्या घोषणेनंतर वाहन उद्योगाला चालना मिळण्याची व वाहनांच्या किमती कमी होण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने मे २०१६ मध्ये जुन्या वाहनांना रस्त्यावरून हटविण्याचा मसुदा तयार केला होता. सरकारचा अंदाज आहे की, हे धोरण सर्वांसाठी आल्यास देशातील १५ वर्षे जुनी सुमारे २.८ कोटी वाहने रस्त्यावरून हटविण्यास मदत होईल. यामुळे वायुप्रदूषणातही घट येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात १५ ते २० वर्षे जुन्या खासगी वाहनांची संख्या ३७,३१६ आहे तर, व्यावसायिक वाहनांची संख्या ४,८२९ इतकी आहे.
- ग्रामीणमध्ये खासगी १२,६१९ तर व्यावसायिक १,०३९ वाहने
आरटीओ नागपूर ग्रामीण कार्यालयांतर्गंत १५ वर्षे जुनी असलेली १३,६५८ वाहने आहेत. यात खासगी १२,६१९ तर व्यावसायिक १,०३९ वाहनांचा समावेश आहे. यात दुचाकीची संख्या ११,६१३ तर चारचाकी वाहनांची संख्या २,०४५ आहे.
-शहरात खासगी २४,६९७ तर व्यावसायिक ३,७९० वाहने
आरटीओ शहर नागपूर कार्यालयात एकूण ६,५२,१६१ वाहनांची नोंद आहे. यात २० वर्षे जुनी असलेल्या खासगी वाहनांची संख्या २४,६९७ तर १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांची संख्या ३,७९० आहे. नव्या धोरणानुसार एकूण २८,४८७ वाहने भंगारात निघण्याची शक्यता आहे.
-१५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या वाहनांची संख्या
आरटीओ कार्यालयखासगी व्यावसायिक
नागपूर ग्रामीण १२,६१९ १,०३९
नागपूर शहर २४,६९७ ३,७९०