नागपूर विद्यापीठ : ३३० कोटींच्या अर्थसंकल्पास व्यवस्थापन परिषदेची मान्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ तसेच इतर पदव्युत्तर विभागांत ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली असून २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिताच्या अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाचा ३३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला व त्याला परिषदेने मान्यतादेखील दिली. अर्थसंकल्पात प्रामुख्याने परीक्षा भवनाचे आधुनिकीकरण व पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.पूरण मेश्राम यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातील निरनिराळ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यापीठाला ‘नॅक’ तर्फे ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. विद्यापीठाचा दर्जा कायम रहावा व यात सुधारणा व्हावी यासाठी विभागांमध्ये सोयीसुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शिवाय पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यानुसार ‘नॅक’च्या शिफारसीनुसार विभागांत आवश्यक असलेले ‘अपग्रेडेशन’, ‘व्हीजन डॉक्युमेंट’मधील शिफारशींची अंमलबजावणी करण्याची योजना अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. शिवाय विभागांमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली. सखोल चर्चेनंतर अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. हा अर्थसंकल्प विधीसभेसमोर मांडण्यात येईल. (प्रतिनिधी)परीक्षा ‘रिफॉर्म्स’साठी १५ कोटींची तरतूदविद्यापीठाच्या अर्थसंकल्पात परीक्षा ‘रिफॉर्म्स’वर भर देण्यात आला आहे. परीक्षा विभागाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थी हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. यंदा विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.तृतीयपंथीयांबाबतच्या मुद्यावर चर्चा ‘पोस्टपोन’विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठाशी संबंधित निरनिराळ्या अर्जांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वत:ची ओळख सांगणारा विशेष रकाना उपलब्ध करून देण्यासंदर्भात शनिवारी व्यवस्थापन परिषदेची हिरवी झेंडी मिळणे अपेक्षित होते. परंतु अर्थसंकल्पावरील चर्चा लांबल्याने या बैठकीत कार्यक्रमपत्रिकेतील इतर मुद्यांवर चर्चाच करण्यात आली नाही. स्थगित बैठक लवकरच घेण्यात येईल अशी माहिती कुलगुरूंकडून देण्यात आली.‘सीओई’, ‘एफओ’च्या मुलाखती लवकरचविद्यापीठाचे पूर्णकालीन ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) व ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून लवकरच पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील असे प्रभारी कुलगुरूंनी स्पष्ट केले. नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रतीक्षा न करता या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यावर प्रशासनाचा भर आहे.
‘कॅम्पस’मध्ये होणार ‘स्मार्ट क्लासरूम’
By admin | Updated: February 1, 2015 01:00 IST