नागपूर : वर्तमान करप्रणालीचे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना पालन करणे कठीण होत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. वर्तमान करप्रणालीचा निषेध म्हणून नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी एनव्हीसीसीच्या सिव्हिल लाइन्स येथील प्रांगणात शुक्रवारी निषेध प्रदर्शने केली. एनव्हीसीसी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची शिखर संघटना आहे.
निषेध प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्र टॅक्सपेअर्स असोसिएशनच्या आवाहनार्थ आणि संपूर्ण भारतातील २०० पेक्षा जास्त व्यापारी संघटना, प्रोफेशनल संस्था आणि करदात्यांना समर्थनार्थ करण्यात आले. मेहाडिया म्हणाले, २०१७ मध्ये जीएसटी लागू करण्यात आला. कराचे पालन करण्यासाठी संगणकाचा सर्वाधिक उपयोग होऊ लागला. त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना कराचे पालन करण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. कराच्या विविध तरतुदींतर्गत करदात्याला विविध त्रुटी काढाव्या लागतात. आयकर, जीएसटी आदींचे नियम आणि तरतुदींमध्ये लवकरच बदल करण्यात येत आहेत. करांचे पालन वेळवर न केल्यास आणि काही चूक झाल्यास विभागातर्फे लेट फी आणि एक दिवस उशीर झाल्यास २४ टक्के दंड आकारण्यात येतो. ही बाब चुकीची आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, जर करदात्यातर्फे काही चूक झाल्यास आणि त्याचे पुन्हा आकलन करायचे झाल्यास व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा करदात्याची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. हा व्यापाऱ्यांवर अन्याय आहे. चेंबरच्या कर समितीचे संयोजक सीए रितेश मेहता म्हणाले, व्यापारी, करदाते आणि प्रोफेशनल संस्थांतर्फे वेळोवेळी कर विभागाकडे अनेक सूचना पाठविल्या आहेत. पण त्यावर विचार करण्यात आलेला नाही. जीएसटी रिटर्नमध्ये काही चूक झाल्यास आणि पुन्हा संशोधन रिटर्न फाइल केल्यास व्यापाऱ्यांवर दंड आकारू नये. जीएसटी अंतर्गत ई-बिलमध्ये संशोधनाची सुविधा द्यावी आणि कर टप्पा कमी करून करदात्याला दिलासा द्यावा.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, कोरोनामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशा वेळी आयकर विभागाने अत्याधिक लेट फी आणि दंड आकारणे चुकीचे आहे. यावर विचार व्हावा.
निषेध प्रदर्शन करतेवेळी चेंबरचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारूखभाई अकबानी, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव उमेश पटेल, शब्बार शाकिर, स्वप्निल अहिरकर, चेंबरचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल, कर समिती सीए संदीप जोटवानी, सीए गिरीश मुंदडा, सीए सिद्धांत अग्रवाल, सीए प्रतीक अग्रवाल आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.