संशोधनातील तथ्य : छोट्याशा डुलकीमुळे हृदयविकार नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुपारची वामकुक्षी ही केवळ काही क्षणांची विश्रांतीच नाही तर अनेक आजारांपासून वाचविणारी गोष्ट आहे. हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थने केलेल्या नवीन संशोधनात ही बाब समोर आली आहे. आयुर्वेदात आधीच वामकुक्षीचे महत्त्व विशद करण्यात आले होते. आता प्रगत विज्ञानानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार, दुपारी केवळ अर्धा तास डुलकी घेणाऱ्यांचा मूड अगदी फ्रेश राहतो आणि ते अधिक क्षमतेने काम करू शकतात. या छोट्याशा डुलकीमुळे हृदयविकाराची शक्यता ३३ टक्क्यांनी कमी होते. जी मंडळी नोकरदार आहेत त्यांच्यासाठी तर ही डुलकी आणखी जास्त लाभदायक आहे. अशा नोकरदार लोकांमध्ये हृदयविकाराची शक्यता ६४ टक्क्यांपर्यंत कमी होते. या संशोधनात असेही समोर आले की, आठवड्यात तीन दिवस दुपारची डुलकी घेतली तर हृदयविकाराची शक्यता ३७ टक्क्यांनी कमी होते. हे यामुळे घडते कारण अर्ध्या तासाच्या डुलकीने शरीराच्या सॉफ्टवेअरला थोडी विश्रांती मिळते. वामकुक्षीवर एक संशोधन चीनमध्येही झाले आहे. या संशोधनात ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील ज्या वृद्धांनी दुपारची डुलकी घेतली होती त्यांनी गणिताचे कोडे अगदी सहजतेने सोडवले आणि जे दुपारी झोपत नव्हते ते उत्तरात मागे पडले. दुपारच्या या डुलकीला इंग्रजीत सिएस्टा म्हणतात, हा शब्द स्पॅनिश भाषेतून इंग्रजीत आला आहे.
दुपारी झोपा, निरोगी राहा...
By admin | Updated: May 26, 2017 02:43 IST