वनांचा ऱ्हास : गडचिरोली आघाडीवर जीवन रामावत नागपूर‘वने’ ही मानव जातीला निसर्गाकडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे, शिवाय वन्यप्राण्यांचा तो हक्काचा अधिवास आहे. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वने’ पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा समतोल राखण्याचे काम करते. प्रामुख्याने जमीन, वनस्पती, प्राणी व सूक्ष्म जीव या घटनांनी मिळून ‘वने’ तयार झाली आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्याही एका घटकाचा नाश झाला तर समतोल बिघडतो आणि पर्यावरणासंंबंधीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच वनांचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते. मात्र असे असताना मागील पाच वर्षांत तस्करांनी सुमारे ६ लाख ६३ हजार ६०३ झाडांची कत्तल केली आहे. यात २ लाख ९४ हजार १८० सागाच्या झाडांचा समावेश असून, यामुळे शासनाचे सुमारे ६ कोटी ४० लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे वनांचे संरक्षण व संवर्धनासाठी काटोकाट प्रयत्न केला जात आहे. गत पाच दशकांपासून वनव्यवस्थापनाची कामे केली जात आहेत, शिवाय काळानुरू प त्यात बदल होत गेला आहे. महाराष्ट्रात मागील ५० वर्षांत वानिका क्षेत्रात अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्राच्या ३ लाख ७ हजार ७१३ चौ. किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१ हजार ७२४ चौ. किलोमीटर (१९.९४ टक्के) इतके वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राचा विभागनिहाय विचार करता, विदर्भात ३३ लाख १९ हजार ८०० हेक्टर वनक्षेत्र आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात २५ लाख २७ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असून, मराठवाड्यात २ लाख ८८ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र मागील काही वर्षांतील परिस्थिती लक्षात घेता, वनांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. अवैध वृक्षतोड, अवैध चराई, आगी व अतिक्रमणांमुळे वनक्षेत्र कमी होत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी अवैध वृक्षतोड ही गावातील लोकांच्या गरजा व शेतीअवजारांसाठी केली जात होती. मात्र मागील काही वर्षांत त्याचे स्वरू प बदललेले दिसून येत आहे. अलीकडे तस्करांकडून संघटितरीत्या व्यापारिक उद्देशातून झाडांची तस्करी केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली वनवृत्तातील सिरोंचा, चंद्रपूर वनवृत्तातील राजुरा, औरंगाबाद वनवृत्तातील नांदेड, धुळे वनवृत्तातील यावल, नंदूरबार व नाशिक वनवृत्तातील पूर्व व पश्चिम नाशिक वन विभागाचा समावेश आहे.
पाच वर्षांत सहा लाख झाडांची कत्तल!
By admin | Updated: July 23, 2015 02:54 IST