लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड रणजित सफेलकर याच्या टोळीतील सराईत गुन्हेगार सिनू अण्णा ऊर्फ श्रीनिवास अँजेय विनयवार (वय ४७, रा. कन्हान कान्द्री) याला गुन्हे शाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या. सफेलकर टोळीविरुद्ध पोलिसांनी दोन वेगवेगळे मोक्काचे गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत पोलिसांनी मनीष श्रीवास हत्याकांडात सफेलकरसह त्याच्या टोळीतील शरद ऊर्फ कालू नारायण हाटे, भरत नारायण हाटे, हेमलाल ऊर्फ हेमंत लालबहादूर गोरखा, विशाल उर्फ इशाक नंदू मस्ते आणि विनयकुमार उर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथव या सहाजणांना अटक केली आहे. सिनू अण्णा फरार होता. त्याला पोलिसांनी बुधवारी (दि. २८) बेड्या ठोकल्या. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करून त्याचा ६ मेपर्यंत पीसीआर मिळवला. सिनू अण्णा हा सफेलकर टोळीतील कुख्यात गुंड असून, तो अनेक गुन्ह्यांतील आरोपी आहे. तो नेहमी सफेलकरसोबतच राहायचा. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
---