जलालखेडा: नरखेड तालुक्यातील सिंजर येथे गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गारपीट झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील हरभरा, गहू, कापूस तसेच संत्रा आणि मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे. हरभऱ्याचे घेगर गळून खाली पडली तर संत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात गळून खाली पडली. गारपिटीमुळे तुरीच्या शेंगा फुटून तुरीचे दाणे मातीमोल झाले. तालुक्यात मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. दुपारी सिंजर परिसरात गारपीट झाली. आधीच नापिकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
-
गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, मुख्यत: मोसंबी, संत्राबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी.
सचिन भिल्लम, सरपंच, सिंजर.
-