शहर सजले भगव्या पताकांनी : विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजननागपूर : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सायंकाळपासून शहरात शोभायात्रा नगरभ्रमण करणार आहे. शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहराला अयोध्येचे रूप आले आहे. जागोजागी स्वागतद्वार, भगव्या पताका व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरात पहाटे ४ वाजता मंगल आरती, अभिषेक व अभ्यंगस्नान होईल. सकाळी ९ वाजता कीर्तन व महामंत्राचा जाप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता षोडशोपचार पूजन झाल्यानंतर मंगल वाद्य, शहनाई वादन, शंखनाद, आरती प्रार्थना व प्रसादाचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर श्री पोद्दारेश्वर मंदिर व श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीद्वारे दुपारी ४ वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल. यावर्षी प्रभू श्रीरामाची सवारी शक्तिरथावर निघणार आहे. श्रीराम सेवक दलाचे १०८ सदस्य शंखनाद करतील. ७७ आकर्षक चित्ररथ यात सहभागी होणार आहेत. -या मार्गाने जाईल शोभायात्राशोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघून काकडे चौक, हंसापुरी, नालसाहब चौक, गांजाखेत चौक, भंडारा रोड, शहीद चौक, चितारओळ चौक, पं. बच्छराज व्यास चौक, केळीबाग रोड, महाल चौक, नरसिंह टॉकीज चौक, गांधीगेट, टिळक पुतळा, सुभाष मार्ग, आग्यारामदेवी चौक, गीता मंदिर, कॉटन मार्केट चौक, जानकी टॉकीज, मुंजे चौक, झांसी राणी चौक, सीताबर्डी मेन रोड, मानस चौक, स्टेशन रोड, संतरा मार्केट होत पुन्हा मंदिरात पोहचेल. शोभायात्रेच्या व्यवस्थेसाठी १४००० स्वयंसेवक तैनात राहणार आहे. (प्रतिनिधी)भोसले घराण्याची शोभायात्रामंगळवारी दुपारी ४ वाजता भोसले राजघराण्याची शोभायात्रा सीनियर भोसला पॅलेस येथून निघणार आहे. त्याचबरोबर धंतोली येथील साईमंदिरात ५ ते १२ एप्रिल दरम्यान श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशपेठ येथील विठ्ठल मंदिरात ह.भ.प. श्रीराम जोशी महाराज यांचे कीर्तन होईल. लकडगंज येथील कालीमाता मंदिरात रामजन्म उत्सव साजरा करण्यात येईल. आपुलकी बहुउद्देशीय संस्थेद्वारा श्रीराम रक्षा स्तोत्र व आरती संग्रहाचे नि:शुल्क वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर घेण्यात येईल. राणाप्रतापनगरतील सार्वजनिक दुर्गादेवी देवस्थान येथे सकाळी अभिषेक व सायंकाळी पालखी निघणार आहे. गिरीपेठ येथील श्रीराम व श्री हनुमान उत्सव समितीद्वारे राम नवमी ते हनुमान जयंतीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेलीशॉप रेल्वे कॉलनी येथील प्राचिन शिवमंदिरात रामजन्म उत्सव साजरा होणार आहे. दुपारी ४ वाजता शोभायात्रा निघणार आहे.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघणार भव्य शोभायात्रा
By admin | Updated: April 4, 2017 02:07 IST