नागपूर : गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. गुढीपाडव्याला मुखत्वे ऑटोमोबाइल, सराफा, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची दुकाने व शोरूम बंद राहिल्याने अनेकांना मुहूर्ताची खरेदी करता आली नाही. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात उत्साहाचे वातावरण असते. हा सण अक्षयतृतीया आणि धनत्रयोदशीप्रमाणे नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ समजला जातो. या दिवशी सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ग्राहक खरेदीसाठी १५ दिवसांपूर्वी वस्तूंचे बुकिंग करतात. यादिवशी फ्लॅट आणि जमिनीचा मोठा व्यवहार होतो. पण यावर्षी कोरोनामुळे दुकाने आणि शोरूम बंद असल्याने सर्व व्यवहारावर पाणी फेरले गेले. गुढीपाडव्याला काही तासांसाठी दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी सर्वच व्यापारी असोसिएशनने मनपा आयुक्त आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. पण त्यावर अखेरपर्यंत निर्णयच झाला नाही.
अनेकजण सराफांकडे आधीच बुकिंग केलेले दागिने गुढीपाडव्याला घरी नेतात. पण शोरूम बंद असल्यामुळे त्यांचीही निराशा झाली. हीच स्थिती ऑटोमोबाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची झाली. नवीन बुकिंग तर आलेच नाहीच; पण गाड्यांचे पूर्वीचे बुकिंगही ग्राहकांनी रद्द केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सध्या वर्क फॉर होम असल्याने लॅपटॉपची विक्री वाढली आहे. याशिवाय या दिवशी अनेकांचा मोबाइल विक्रीवर भर असतो. पण या क्षेत्राचीही निराशा झाली इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यावसायिकांनी ऑनलाइन विक्रीवर भर दिला आणि त्याला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. नागपुरात वस्तू पाहून आणि हात लावून खरेदीवर ग्राहकांचा भर असतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.
लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांचे प्रश्न
- निवडणुकांमध्ये राजकीय सभेतील गर्दी कशी चालते?
- किराणा दुकाने सुरू आहेत. रस्त्यावर गर्दी आहे. तिथे कोरोना कसा रोखला जातो?
- भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. तिथे कोरोनाचा प्रसार होत नाही का?
- सरकार भरपाई किंवा करमाफी, वीजमाफी देणार का?
- सर्व नियमांचे पालन करणाऱ्या दुकानदारांकडून कोरोना कसा पसरतो?
- परिस्थिती गंभीर आहे. नियम मात्र सर्वांना सारखे का नाहीत?
व्यवसायावर परिणााम
गुढीपाडवा सणासाठी सराफांना आधीच बुकिंग मिळत होती. पण लॉकडाऊनमुळे स्थिती विपरीत झाली. ज्वेलरीमध्ये ग्राहकांचा दागिना पाहून खरेदीवर भर असतो. शोरूम सुरू न झाल्याने ग्राहक खरेदीपासून वंचित राहिले. पण अनेकांनी बुकिंग केले असून, शोरूम सुरू होईल, तेव्हा त्यांना दागिने देण्यात येणार आहे.
राजेश रोकडे, सराफा व्यावसायिक
फ्लॅट विक्रीला फटका
गेल्या काही महिन्यांपासून फ्लॅट खरेदीसाठी लोकांकडून विचारणा होत होती. शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्याने बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले होते. पण आता लॉकडाऊनमुळे लोक निर्णय घेण्यात असमर्थ आहेत. साइटवर काम सुरू आहे. पण कार्यालय बंद असल्याने ग्राहक येत नाहीत.
गौरव अगरवाला, बिल्डर
लॉकडाऊनमुळे नवीन बुकिंग नाही
गुढीपाडवा ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी मुहूर्ताचा दिवस असतो. अनेकजण नवीन गाड्या घरी नेतात; पण यंदाही शोरूम बंद राहिल्याने लोकांना गाड्यांची डिलिव्हरी देता आली नाही. काहींनी गाड्यांचे बुकिंग रद्द केले. शिवाय नव्याने गाड्यांचे बुकिंग नाही. त्यामुळे विक्रेते संकटात आले आहेत.
डॉ. पी.के. जैन, ऑटोमोबाइल विक्रेते.