नागपूर : मोमिनपुरा मार्केटच्या मोहम्मद अली सराय रोडवर वाहतुकीची गंभीर समस्या आहे. अतिक्रमणाने येथील रस्ते अरुंद झाले आहेत. सरायच्या मुख्य दारापासून रस्त्यापर्यंत २० फूट लांब जागेवर पार्किंगची घोषणा करण्यात आली आहे. रुंदीच्या हिशेबाने पार्किंग मोठे आहे, पण या पार्किंग स्थळाचे दुकानदार भाडे वसूल करीत आहेत.
सरायच्या होस्टेलपासून बब्बन हॉटेलपर्यंत रुंद परिसरात पार्किंग झोन बनविता येऊ शकते. याकरिता खुद्द मो. अली सराय गेल्या अनेक वर्षांपाासून प्रशासनाकडे मागणी करीत आहे. पण प्रशासन यावर गंभीर नाही. सरायच्या पार्किंग स्थळावर स्थानीय दुकानदारांनी कब्जा केला आहे. स्थानीय दुकानदार आपल्या दुकानासमोरील या पार्किंग जागेवर असलेले हातठेले, चहाटपरी आणि अन्य दुकानदारांकडून दररोज भाडे वसूल करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मो. अली सरायच्या मंजूर नकाशात मुख्य प्रवेशदारापासून २० फूट लांब पार्किंगसाठी जागा सोडली आहे. ही जागा होस्टेलपासून बब्बन हॉटेलपर्यंत विस्तृत आहे. या प्रकारे बब्बन हॉटेल ते मेयो रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीपर्यंत १० फूट परिसरात पार्किंग घोषित केले आहे. स्थानिक दुकानदार पार्किंग जागेवर जास्त भाडे वसूल करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सराय अनुसार दुकानदारांचे मासिक भाडे ३ हजार रुपये आहे. तर हेच दुकानदार पार्किंगच्या जागेवर दुकान लावणाऱ्यांकडून दररोज ३०० ते ५०० रुपये वसूल करतात. या दोन्ही पार्किंग स्थळावर स्थानिक दुकानदारांचा कब्जा आहे. तर मेयो रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीकडे कबाड विक्रेत्यांचा ताबा आहे. प्रशासनाने दोन्ही जागेला पार्किंग झोन घोषित केले तर मोमिनपुरा मार्केटमध्ये पार्किंगची समस्या सुटेल आणि अतिक्रमणावर आळा बसेल व वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. मोमिनपुरा भागातील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब आहे. त्यामुळे अनेकदा वाद होतात.
पार्किंग झोन व्हावा
मोहम्मद अली सरायच्या मंजूर नकाशात मुख्य प्रवेशद्वारापासून रस्त्यापर्यंत पार्किंग घोषित केले आहे. या जागेवर दुकानदारांचा कब्जा आहे. या जागेला पार्किंग झोन घोषित करण्याची मागणी वाहतूक विभागाकडे अनेकदा निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या जागेवर वाहन उभे करता येईल. पण विभाग कानाडोळा करीत आहे.
- हाजी मो. कलाम, सचिव सीटीसी (मो. अली सराय).