योगेश पांडे
नागपूर : शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी मोडली जावी यासाठी नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ हाती घेतले आहे. मागील काही काळापासून नागपुरात अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यातही ‘एमडी’ (मेफेड्रोन) मिळावा यासाठी तरुण-तरुणी कुठल्याही थराला जाण्यास तयार असल्याचे चित्र आहे. २०१८ सालापासून पोलिसांनी केलेल्या कारवाईतील ४० टक्के ‘एमडी’ची जप्ती या वर्षी आठ महिन्यांतच झाली असून, यातूनच वापर वाढत असल्याची तीव्रता लक्षात येत आहे.
मागील काही कालावधीपासून नागपुरात अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण पिढी व विद्यार्थ्यांना गुन्हेगारांकडून ‘टार्गेट’ करण्यात येते. सर्वसाधारणत: शहरात पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये गर्दुल्ले मोठ्या प्रमाणावर सापडतात व त्यांच्याकडून गांजा, भांग, चरस जास्त प्रमाणात जप्त करण्यात येते. परंतु कोरोनानंतर ‘एमडी’ तस्करी करून ‘ड्रग पेडलर्स’च्या माध्यमातून त्याचा पुरवठा करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनीदेखील ड्रग रॅकेटविरोधात उचलण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नागपुरात एकूण ५ कोटी ८७ लाख ५६ हजार ७०२ रुपयांचे अमली पदार्थ जप्त झाले. यात ‘एमडी’शी निगडीत ८७ प्रकरणे होती व ३ किलो ९३ ग्रॅम ५११ मिली ग्रॅम साठा जप्त झाला होता. याची एकूण किंमत १ कोटी ९४ लाख ७७ हजार ७१० इतकी होती. मात्र २०२२ मध्ये कारवाईचे प्रमाण वाढले असून ८ महिन्यांतच २१ प्रकरणांत ८०५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले व याची किंमत ७८ लाख ७९ हजार इतकी होती. एकूण कारवाईच्या तुलनेत २०२२ मधील जप्तीचे प्रमाण हे ४० टक्के इतके होते.
‘हॉटस्पॉट’वर जास्त ‘वॉच’ हवा
शहरात विविध ठिकाणी ड्रग पेडलर्सकडून ‘एमडी’ची विक्री करण्यात येते. शहरात अमली पदार्थांची प्रामुख्याने विक्री व व्यवहार होत असलेले २२ ‘हॉटस्पॉट’ आहेत. या ठिकाणांवर जास्त लक्ष ठेवल्यास आणखी पेडलर्स ताब्यात येऊ शकतात.
पुरवठ्यासाठी बेरोजगारांचादेखील उपयोग
‘एमडी’चा पुरवठा हा सर्वसाधारणत: मोठ्या शहरांमधून करण्यात येतो. नागपुरात मुंबई, बदलापूर इत्यादी ठिकाणावरून माल येतो. हा माल सुरक्षितपणे यावा यासाठी गुन्हेगारांकडून शिक्षित बेरोजगार तरुणांचा उपयोग करण्यात येत असल्याची बाबदेखील समोर आली होती.