नागपूर : शिवसेनेकडून युती करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तरच त्यावर विचार केला जाईल. भाजप स्वत:हून कुठलाही प्रस्ताव देणार नाही. भाजप नेते स्वत:हून चर्चेसाठी जाणार नाहीत. शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेऊन विनंती केली व सन्मानजनक प्रस्ताव दिला तर चर्चा होईल. शहरात आपली शक्ती व जनतेचा असणारा पाठिंबा यावर आत्मचिंतन करूनच शिवसेनेला प्रस्ताव द्यावा, अशी रोखठोक भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. यामुळे भाजप-सेना युतीचे भवितव्य अधांतरी दिसत आहे. गेल्यावेळी शिवसेनेने ५१ जागांचा प्रस्ताव दिला होता. चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. दुसऱ्या फेरीत मतभेद होऊन युती तुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेवटी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सावरत तिसऱ्या फेरीत शिवसेनेला १८ जागा देत युतीवर शिक्कामोर्तब केले होते. यावेळी अद्याप शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव भाजपकडे आलेला नाही. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे शिवसेनेलाच आपली गरज आहे, अशी भाजपची धारणा झाली आहे. त्यामुळे भाजप स्वत:हून पुढाकार घेण्यास इच्छुक नाही. युतीबाबत भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, भाजपने शिवसेनेपुढे नतमस्तक व्हावे, अशी परिस्थिती नागपूर शहरात नाही. शहरातील सहाही आमदार भाजपचे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभा निवडणुकीत २ लाख ६५ हजार मतांनी जिंकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला कुणापुढेही हात जोडण्याची गरज नाही. शिवसेनेने विनंती केली तर पुढे बघता येईल. दोनअंकी जागाही देणे कठीण ? गेल्या वेळी भाजपने शिवसेनेसाठी युतीत १८ जागा सोडल्या होत्या. याशिवाय ४ जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यापैकी शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले. आता शितल घरत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सद्यस्थितीत भाजप दोन आकडी जागा देण्यासही तयार नाही. भाजप नेत्यांविषयी उपरोधक, अपमानजनक आणि महाराष्ट्राच्या सन्मानाला ठेच पोहचविणारे शब्द वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी आपण युतीची चर्चा करणार नाही. भाजप नेते स्वत:हून चर्चेला जाणार नाहीत. शिवसेनेचे नेते स्वत:हून सन्मानजनक प्रस्ताव घेऊन आले तरच युतीचा विचार करू. नुसत्या चर्चेत वेळ घालविण्यात भाजपला रस नाही. - आ. सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष भाजप
शिवसेनेशी स्वत:हून चर्चेला जाणार नाही
By admin | Updated: January 14, 2017 02:25 IST