नागपूर : बिहार निवडणूका मतमोजणीच्या एक दिवस आधी शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपुरात दाखल होऊन संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. बिहार निकालाच्या पार्श्वभूमीवर संघाकडून शहा यांना काय उपदेश दिला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, शहा यांच्या या दौऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडे कुठलीही अधिकृत माहिती नाही. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शनिवारी सकाळी १०.३० रजवाडा पॅलेस येथे एका बँकेच्या शाखेचे लोकार्पण आहे. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून अमित शहा यांचे नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, शहा यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम अद्याप भाजपला मिळालेला नाही. पोलिसांकडेही माहिती नाही. सूत्रांच्या मते या कार्यक्रमानंतर शहा हे संघ मुख्यालयात जाऊन संघ नेत्यांशी चर्चा करतील. बिहारचे निकाल रविवारी येणार असल्यामुळे निकालानंतरची रणनीती या चर्चेत आखली जाईल. त्यामुळेच शहा यांच्या नागपूर भेटीचे महत्त्व वाढले आहे. (प्रतिनिधी)
संघभेटीसाठी शहा आज नागपुरात ?
By admin | Updated: November 7, 2015 03:07 IST