न्यायालय : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : जेल ब्रेकसाठी वापरण्यात आलेल्या सात चादरींचा दोर जप्त करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी धंतोली पोलिसांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणातील तीन आरोपी आणि त्यांच्या एका साथीदाराला पोलिसांनी वेगवेगळ्या न्यायालयात हजर करून त्यांचा वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. धंतोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तपास अधिकारी के.एन. गड्डिमे यांनी आरोपी आकाश ठाकूर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २६ मेपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. सरकार पक्षातर्फे या आरोपीचा २९ मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. कारागृहाची भिंत चढण्यासाठी वापरण्यात आलेला सात चादरींचा दोर जप्त करण्यात आलेला आहे. या शिवाय या प्रकरणात आतापर्यंत हिरोहोंडा मोटरसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. या प्रकरणातील आरोपी बैतुल येथे मुक्कामास असताना त्यांना बबलेश यादव नावाच्या एका गुन्हेगाराने आश्रय दिल्याचे समजले असून या आरोपीला अटक करणे आहे. अद्याप फरार असलेल्या सत्येंद्र गुप्ता आणि बिसेनसिंग यांना हुडकून काढून अटक करावयाची आहे. त्यापैकी एकाचा ठावठिकाणा आकाश ठाकूरने सांगितलेला आहे. न्यायालयाने तपासातील प्रगती लक्षात घेऊन आकाशच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये २६ मेपर्यंत वाढ केली. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील जाधव तर आरोपीच्यावतीने अॅड. धवल यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामात हेड कॉन्स्टेबल संजय प्रधान यांनी सहकार्य केले. जेल ब्रेक प्रकरणातील अन्य दोन आरोपी मोहम्मद सोहेबखान ऊर्फ शिब्बू सलीमखान ,प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि त्यांचा साथीदार अरमान मुन्ना मलिक यांना तपास अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सी. पी. ढोले यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवानी यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा त्यांचा २५ मेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेतला. या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी कोराडी भागात तीन माऊझर व १० जिवंत काडतुसांसह अटक केली होती. भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ३/२५ अंतर्गत तपास सुरू असल्याने त्यांची पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आली. जेल ब्रेक प्रकरणाच्या तपासासाठी धंतोली पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहे. (प्रतिनिधी)
सात चादरींचा दोर जप्त
By admin | Updated: May 23, 2015 02:45 IST