वाघोडा रेतीघाटात धाड : २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल हस्तगतपारशिवनी : बाजारात कन्हान नदीच्या रेतीला चांगली मागणी आहे. त्यामुळे रेतीमाफियांनी कन्हान नदीवरील रेतीघाटांना लक्ष्य केल्याने रोज मोठ्या प्रमाणात रेती चोरून नेली जात आहे. त्यातच पारशिवनी पोलिसांनी कन्हान नदीवरील वाघोडा रेतीघाटात धाड टाकली. पोलिसांना पाहताच घाटमालकाचे हस्तक अंधाराचा फायदा घेत पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही, दुसरीकडे, दोन पोकलॅण्ड मशीन आणि सात ट्रक तसेच १० ब्रास रेती पोलिसांच्या हाती लागल्याने ती जप्त करण्यात आली. या वाहन व रेतीची एकूण किंमत २ कोटी २० लाख २० हजार रुपये आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री करण्यात आली.पारशिवनी तालुक्यातून वाहणाऱ्या वाघोडा घाटाचा रीतसर लिलाव करण्यात आला असून, हा घाट नागपूर येथील के. बी. ट्रान्सपोर्ट नामक कंपनीला अंदाजे १ कोटी ७० लाख रुपयांमध्ये देण्यात आला आहे. सध्या या घाटात २४,८३७ ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, या घाटात रात्रभर रेतीचा उपसा करून रेतीची उचल केली जात असल्याची माहिती रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी यांना मिळाली होती. त्यामुळे मतानी यांनी या घाटात धाड टाकण्याची योजना तयार केली. लोहीत मतानी, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, जॉन फ्रान्सीस, संदीप नागोसे व राजू अवणे मध्यरात्री १२.१० वाजताच्या सुमारास वाघोडा घाटाजवळ पोहोचले. मतानी नदीच्या एका बाजूला होते तर अन्य तीन पोलीस कर्मचारी नदीच्या दुसऱ्या बाजूला गेले. त्यावेळी त्यांना नदीच्या पात्रात पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचा उपसा केला जात असून, रेती ट्रकमध्ये भरती जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्यांनी मतानी यांना ठरल्याप्रमाणे टॉर्च दाखवून इशारा केला. हा प्रकार घाटमालकाच्या ट्रकचालकांच्या लक्षात आला. त्यातच पोकलॅण्ड मशीनचालकाने मशीनचा बूम मतानी यांच्या दिशेने केल्याने मतानी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच नागपूरहून अतिरिक्त पोलीस कुमक मागविली तसेच तहसीलदार बाळासाहेब तेढे यांना मााहिती देत घाटात बोलावून घेतले. ही कुमक घाटात पोहोचेपर्यंत घाटमालकाच्या हस्तकांनी संपूर्ण साहित्य घाटात सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यामुळे पोलिसांच्या हाती एमपी-१८/जीए-२४६२, एमएच-४०/वाय-७६८५, एमएच-२६/एडी-२२५५, एमएच-२६/एडी-३३५५, एमएच-४०/वाय-७५३८, एमएच-२६/एडी-४४५५ व एमएच-४०/एके-६९५ क्रमांकाचे सात ट्रक आणि आर-२१५/एलसी-७ (मशीन क्रमांक एसआर-एन-६०३/डी-००६०७) व ईएक्स-२००/एलसी (मशीन क्रमांक २००१-१३३-९६)सह १० ब्रास रेती लागली. (तालुका प्रतिनिधी)रेतीचा अवैध उपसाकन्हान नदीवरील वाघोडा घाटाचा लिलाव करण्यात आला असून, घाट रेती उपशासाठी कंत्राटदाराला हस्तांतरित करण्यात आला. वास्तवात, घाटात रेतीचा उपसा कामगारांकरवी करावा लागतो. रेतीचा उपसा करण्यासाठी रोज सूर्योदय ते सूर्यास्त हा काळ ठरवून देण्यात आला आहे. मात्र, घाटमालक सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवून पोकलॅण्ड मशीनद्वारे रात्रभर रेतीचा उपसा करतात. या प्रकारात रॉयल्टीच्या तुलनेत अधिक रेतीचा उपसा केला जात असल्याने शासनाचा महसूल बुडतो व दुसरीकडे, नदीचे पात्र व घाटाच्या परिसरातील रस्त्यांचे नुकसान होते. हा संपूर्ण प्रकार महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही कुणीही कारवाई करण्याचे धाडस करीत नाही.
दोन पोकलॅण्डसह सात ट्रक जप्त
By admin | Updated: April 10, 2017 02:22 IST