गडकरींच्या वाढदिवशी सुरुवात : ७८ प्रसिद्ध डॉक्टर देणार सेवानागपूर : भारतीय जनता पक्ष दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातर्फे २१ ते २७ मे दरम्यान बीआरए मुंडले शाळा, दीक्षाभूमी येथे सात दिवसीय महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनी म्हणजे २१ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन होईल. शिबिरात पद्मपुरस्कार प्राप्त डॉक्टरांसह ७८ तज्ज्ञ चिकित्सक सेवा देतील. शिबिराचे संयोजक भाजपचे महामंत्री संदीप जोशी व सहसंयोजक प्रकाश भोयर यांनी पत्रकार परिषदेत शिबिराची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर होत आहे. २१ मे रोजी महापौर प्रवीण दटके व भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, सामान्य रोग, डोके, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक घसा, स्त्री रोग, सामान्य तपासणी, त्वचा रोग, मनोरोग, श्वसन विकार, क्षयरोग, कॅन्सर, मधुमेह, थायरॉइड, दंत रोग, पॅथोलॉजी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय, ईएमसी, ईसीजी, २-इको, ईईजी, मॅमोग्राफी, बीएमडी, पीएफटी आदींची तपासणी नि:शुल्क केली जाईल. सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत शिबिर सुरू राहील. २७ मे रोजी शेवटच्या दिवशी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत शिबिरात आरोग्य सेवा दिली जाईल. शिबिरातील तपासणीनंतर गरज वाटल्यास २७ ते ३१ मे दरम्यान शस्त्रक्रिया केली जाईल. शिबिरात डॉ. अभय संचेती, डॉ. शरद हर्डीकर, डॉ. टी. पी. लहाने, डॉ. विकास महात्मे, डॉ. नटराजन, अमित मायदेव या पद्मश्री प्राप्त डॉक्टरांसह ७८ डॉक्टर सेवा देतील. शिबिरासाठी आजवर साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली असून सुमारे २५ हजार रुग्ण येतील, अशी अपेक्षा संदीप जोशी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला रमेश सिंगारे, मुन्ना यादव, विवेक तरासे, किशोर वानखेडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजप घेणार सात दिवसीय महाआरोग्य शिबिर
By admin | Updated: May 21, 2016 02:56 IST