पोलिसांची ‘आयएमए’ व ‘व्हीएचए’शी बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस इस्पितळाची सुधारणा आणि पुनर्रचना करण्यासाठी तसेच पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा देण्यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्षा डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे सचिव डॉ. अनुप मरार उपस्थित होते. पोलीस रुग्णालयाच्या समस्या दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी सुहास बावचे यांनी प्रस्ताव सादर केला होता. याला घेऊन झालेल्या या बैठकीत डॉ. खंडाईत म्हणाल्या, पोलीस कल्याण योजनेमध्ये नागपूर ‘आयएमए’चा सहभाग करून घेतल्याने याचा फायदा रुग्णांंना होईल. शिवाय, जास्तीत जास्त तज्ज्ञ या उपक्रमात सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने वैद्यकीय सेवा देतील. सोयीसाठी सेवा देणाऱ्या तज्ज्ञांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे, असेही त्या म्हणाल्या. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पोलीस कल्याण निधीमार्फत रुग्णालयात आवश्यक यंत्रसामुग्रीची खरेदी केली जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार मांडले.
पोलिसांच्या कुटुंबीयांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
By admin | Updated: June 24, 2017 02:32 IST