नागपूर - कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. इंजेक्शन, औषधे, ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी कार्यरत यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत. तर, भीती आणि अफवांमुळे सर्वत्र हाहाकार निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, अलंकार चौक मार्गावरच्या एका इस्पितळात आणि जरीपटक्यातील एका सिलिंडर प्लांटमध्ये सिलिंडर उचलून नेण्याच्या घटना घडल्याने सोमवारी शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास अचानक काही जण डॉ.जय देशमुख यांच्या इस्पितळात पोहोचले. त्यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर उचलून सरळ आपल्या वाहनात ठेवले. इस्पितळ प्रशासनाने या दंडेलीबाबत विचारणा केली असता, आम्ही महापालिका कर्मचारी असून, तुमचे सिलिंडर जप्त करीत असल्याचे सांगितले.
डॉ. देशमुख हे शहरातील प्रतिष्ठितच नव्हे तर सेवाभावी डॉक्टर म्हणून परिचित आहेत. ते अहोरात्र रुग्णसेवेत असतात. त्यांच्या इस्पितळात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यांच्यातील अनेक जण ऑक्सिजनवर असल्याने या प्रकारामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांनाही भयंकर टेंशन आले. अशी दंडेली महापालिकेचे कर्मचारी करूच शकत नाही, असा विश्वास असल्याने संतप्त झालेल्या इस्पितळाचे कर्मचारीच आणि रुग्णांच्या नातेवाइकांंनी त्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत त्यांचे वाहन अडवले. दरम्यान, हे महापलिकेचे कर्मचारी नसावे, ऑक्सिजन सिलिंडर चोरणारे समाजकंटक असावे, असा संशय आला. या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांच्याकडेशी विचारणा केली. यानंतर कर्मचाऱ्यांनी वाहनात ठेवलेले इस्पितळातील ऑक्सिजन सिलिंडर परत करून वऱ्हाडे यांनी डॉ. देशमुख यांच्याकडे खेद व्यक्त केला.
((२))
उत्तर नागपुरात उद्योजक बी.सी. भरतिया यांचे भरतिया मेडिकेअर सर्व्हिसेस नावाने ऑक्सिजन प्लांट आहे. तेथे सोमवारी पहाटे पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी शिफ्ट इंचार्जकडे ऑक्सिजन सिलिंडरबाबत विचारणा करून सात सिलिंडर ताब्यात घेतले. तेथील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेऊन वाद घातल्यामुळे पोलिसांनी ऑपरेटरसह दोघांना सोबत नेले. निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे कामगारांचे उत्पादन प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्याने अचानक मशीन बंद पडली. ऑक्सिजन सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सर्वत्र हाहाकार असताना उत्पादन प्रक्रियाच ठप्प झाल्याने प्लान्टवरील सर्व हादरले. ही माहिती बी. सी. भरतिया यांना देण्यात आली. ते खरोखर पोलीसच होते का, याबाबतही शंका व्यक्त झाली. यामुळे भरतिया यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर, उपायुक्त निलोत्पल यांनी चाैकशी केली. तिरपुडे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर असल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. तिरपुडे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पोलिसांना धोक्याची कल्पना देऊन ऑक्सिजन प्लांटबाबतही माहिती दिली. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी तेथून सिलिंडर आणल्याचे स्पष्ट झाले.
---
अफवांचा बाजार गरम
ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने महापालिका कर्मचारी तसेच पोलिसांच्या वेषात काही समाजकंटक आले आणि त्यांनी डॉ. देशमुख यांच्या इस्पितळातून तसेच भरतिया यांच्या प्लांटमधून सिलिंडर उचलून नेण्याची जोरदार चर्चा शहरात पसरली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली; मात्र असला काहीही प्रकार नव्हता. तर दोन्ही ठिकाणी केवळ रुग्णांचे जीव वाचावे म्हणूनच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांनी सिलिंडर उचलल्याचे स्पष्ट झाले.
----
गैरसमजातून घडल्या घटना
बजाज नगरचे ठाणेदार महेश चव्हाण यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली असता, डॉ. देशमुख यांनी प्रकरणाची तक्रार द्यायची नाही, असे म्हटल्याचे सांगितले. तर डॉ. देशमुख यांनी झालेल्या प्रकाराबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी खेद व्यक्त केल्यामुळे आपल्यासाठी हे प्रकरण संपल्याचे लोकमतला सांगितले. बनावट पोलीस किंवा दुसऱ्या विभागाचे अधिकारी बनून सिलिंडर लुटमारीचे प्रकार घडू शकतात, ही शक्यता ध्यानात घेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त सिलिंडर प्लांटवर लावण्यात आला.
----