प्रतिबंधित नायलॉन मांजा बाजारात : अनेकांचे गेले आहेत जीव रियाज अहमद नागपूर मकरसंक्रांत काळात पतंगामुळे आकाश रंगीबिरंगी होते. नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग उडवतात. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे माणसे, प्राणी व पक्ष्यांना इजा पोहोचते. बरेचदा प्राणहानी होते. परिणामी शासनाने नायलॉन मांजाचा वापर व विक्रीवर बंदी आणली आहे. असे असताना शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजाची लपून विक्री होत आहे. विक्रेते वेगवेगळ्या कंपन्यांच्या नायलॉन मांजाची जास्तीची किंमत घेऊन विक्री करीत आहेत. कारवाईच्या भीतीमुळे नायलॉन मांजा लपवून ठेवला जातो. ग्राहक आल्यानंतर मागणीनुसार नायलॉन मांजा दिला जातो. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. पहिला प्रसंग टिमकी, गोळीबार चौक रोड पत्रकार : हा कोणता मांजा आहे? दुकानदार : बरेली मांजा आहे. पत्रकार : नायलॉन मांजा, चकरीसह किती रुपयांत मिळेल? दुकानदार : ५५० रुपयांत मिळेल. पत्रकार : यापेक्षा कमी किमतीचा नायलॉन मांजा नाही काय? दुकानदार : आहे, पण दुसरीकडून मागवावा लागेल. त्याचा माल नाही. हा मांजा विकल्यास १ लाख रुपये दंड आहे. दुसरा प्रसंग शहीद चौक, इतवारी पत्रकार : चकरी किती रुपयाला दिली? दुकानदार : ६० रुपयाला. पत्रकार : नायलॉन मांजा आहे काय? दुकानदार : आहे, एका कंपनीचा ६०० तर, दुसऱ्या कंपनीचा ४०० रुपयांत मिळेल. किंमत कमी होणार नाही. घ्यायचा असल्यास आताच मिळेल, नंतरची हमी नाही. पत्रकार : पाहू देता का? दुकानदार : पाहण्यासाठी मिळणार नाही, खरेदी करायचा असल्यास आणून देतो. प्रसंग तिसरा राणी दुर्गावती चौक पत्रकार : नायलॉन मांजा आहे का? दुकानदार : आहे, ४०० रुपयांत मिळेल. पत्रकार : चार-पाच चकरी नायलॉन मांजा पाहिजे. दुकानदार : दोनच चकऱ्या वाचल्या आहेत. महाग माल आहे. त्यामुळे जास्त ठेवत नाही. पत्रकार : एक चकरी किती रुपयांची आहे? दुकानदार : ७०० रुपयांत मिळेल. किंमत कमी होणार नाही.
बंदीनंतरही विक्री
By admin | Updated: January 5, 2017 02:02 IST