नागपूर : कुटुंबासह बंगळूरला जात असताना रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर झोप लागली. झोपेतून उठल्यावर पत्नी अन् मुलगा जवळ नव्हता. लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी पत्नी आणि मुलाचा शोध घेतला आणि ते दोघेही समोर दिसताच, पतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. यापुढे पत्नीशी भांडण करणार नाही, असे पोलिसांना वचन देऊन तो पुढील प्रवासासाठी निघून गेला.
शिवनी येथील रहिवासी संदीप (२८) हा मूर्तिकार आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न यशकला (२४) हिच्यासोबत झाले. त्यांना एक गोंडस बाळ झाले. होळीसाठी दोघे पती-पत्नी मुलासह गावाकडे आले होते. परत बंगळूरला जाण्यासाठी ते नागपूर रेल्वे स्थानकावर आले, परंतु गाडीला वेळ असल्याने संदीपला डोळा लागला. झोपेतून उठल्यावर त्याला पत्नी आणि मुलगा दिसला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर त्याने लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली, परंतु यशकलाचा मोबाइल बंद असल्यामुळे तिचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली. दोन दिवसांनंतर तिने मोबाइल सुरू करताच, तिचे लोकेशन समजले आणि बुटीबोरी येथून एका मजुराच्या तंबूत ती मुलासह आढळली. तिला लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले असता, तिने पती भांडण करीत असल्यामुळे निघून गेल्याचे सांगितले, परंतु पत्नी आणि मुलगा सुखरूप भेटल्याचे पाहून संदीपच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. परत पत्नीशी भांडण करून तिला मारहाण करणार नाही, असे वचन त्याने लोहमार्ग पोलिसांना दिले आणि तो कुटुंबासह बंगळूरच्या दिशेने रवाना झाला.