६० खाटांची क्षमता असणार : अपघात विभागही सुरू होणारनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ३० एप्रिलपर्यंत ‘सिटी स्कॅन’, ‘डिजिटल एक्स-रे’, ‘१० व्हेंटिलेटर्स’, दुसऱ्या माळ्यावर वाढीव ३० खाटा, ‘सेंट्रललाईज आॅक्सिजन’ पुरवठा प्रणाली व अपघात विभाग (कॅज्युल्टी) सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पुढील महिन्यापासून ‘ट्रॉमा’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ट्रॉमा युनिट तीन माळ्यांचे आहे. यात ९० खाटांचे तीन अतिदक्षता वॉर्ड आहेत. परंतु, टप्प्याटप्याने प्रत्येक वर्षी ३० खाटांचे ट्रॉमा सुरू होणार आहे. ट्रॉमात खाटांची संख्या ३० वर येऊन थांबली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सिटी स्कॅन व एक्स-रे मशीन स्थापन करण्याच्या कार्याला वेग आला आहे. यातच दुसऱ्या माळ्यासाठी ३० खाटांची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून येथे ‘सेंट्रलाईज आॅक्सिजन प्रणाली’ लावण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ट्रामाच्या खाटांची क्षमता ३० वरून ६० होताच, मेडिकलचा अपघात विभागच ट्रामात असणार आहे. येथेच रुग्णांची तपासणी होईल. रुग्णांना पिवळा, हिरवा आणि लाल रंगाचा ‘बॅण्ड’ बांधला जाईल. पिवळ्या रंगाचा बॅण्ड असलेल्या रुग्णावर ट्रामात उपचार झाल्यानंतर मेडिकलच्या संबंधित वॉर्डात पाठविले जाईल. हिरव्या रंगाचा बॅण्ड असलेल्या रुग्णाला तत्काळ अतिदक्षता विभागात हलविण्यात येईल तर लाल रंगाचा बॅण्ड असलेल्या रुग्णाच्या विविध तपासण्यांना प्राधान्य देत एका तासाच्या आत त्याच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया केली जाईल. याचा सर्वाधिक फायदा अपघात विभागात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना होईल.(प्रतिनिधी)
‘ट्रॉमा’चा दुसरा टप्पा महिनाभरात
By admin | Updated: April 4, 2017 02:14 IST