आरोपींनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन औषधी, तेल, केमिकल, वाईन आणि पाणी भरण्यासाठी प्लास्टिक बॉटल तसेच कच्चामाल तयार करणारी मशीन विकण्याचा प्रपोगंडा केला होता. दर दिवशी पाच ते सात हजार रुपये कमाई होईल, अशी थापही मारली होती. त्यातून आरोपींनी मनोज संभाजी मोटघरे, नंदनवन तसेच अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातला. आर्थिक गुन्हे शाखेकडे ७ फेब्रुवारी २०१८ रोजी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी शर्मा, पांडे आणि निकू या तिघांनी एक कोटी सहा लाख रुपये हडपल्याचे उघड झाले. पोलीस तेव्हापासून त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांचे पथक राजस्थानमध्ये जाऊन आले. मात्र नमूद पत्त्यावर आरोपी मिळाले नाही. त्यामुळे आरोपी शर्मा, पांडे आणि निकु यांच्याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी आज केले आहे.
ठगबाज त्रिकूटाची शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST