नागपूर : ‘आयआयएम’, ‘एम्स’ अन् ‘ट्रीपल आयटी’सारख्या नामांकित अभियांत्रिकी व वैद्यकीय संस्था नागपुरात येत असल्याने देशासोबतच जागतिक नकाशावर शहराचे नाव येणार आहे. नागपुरातील विविध अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांचा भर ‘स्कील’ वाढविण्यावर दिसून येत असून देश-विदेशातील नामांकित कंपन्यादेखील त्यांच्या ‘टॅलेंट’चा शोध घेत महाविद्यालयांकडे येत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कंपन्यांकडूनदेखील यासंदर्भात पुढाकार घेण्यात येत असून ‘फ्रेशर’ विद्यार्थ्यांना संधी देण्याकडे त्यांचा कल आहे. यासाठी शहरात प्रथमच ‘स्पीड हायरिंग’च्या उपक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे हे विशेष.गेल्या काही काळापासून उद्योगजगतात नागपुरातील विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. जर विद्यार्थ्याकडे शैक्षणिक गुणवत्ता आणि कौशल्य असेल तर त्याला पदवी मिळण्याअगोदर ‘आॅफर लेटर’ मिळत आहे. परंतु ‘कॅम्पस सिलेक्शन’साठी बाहेरील कंपन्या येण्याचेच प्रमाण जास्त असते. शहरातील किंवा आजूबाजूच्या स्थानिक कंपन्यांचे प्रमाण यात फारसे दिसून येत नाही. या कंपन्यांना विद्यार्थ्यांच्या ‘टॅलेंट’चा शोध घेता यावा यासाठी नागपुरात प्रथमच ‘अपॉईन्टमेन्ट १.०’ या ‘स्पीड हायरिंग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज् अॅन्ड रिसर्च येथे शनिवारपासून याची सुरुवात झाली.(प्रतिनिधी)
नागपूरच्या ‘टॅलेंट’चा शोध
By admin | Updated: April 12, 2015 02:24 IST