लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत अचानकपणे बंद झालेल्या शाळांचे काही वर्ग तब्बल १० महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर सुरू झाले. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी बहुतांश गावात ‘लालपरी’ची सेवा सुरू झाली नाही. शाळा सुरू झाल्या, आता एसटी बसेस कधी सुरू होणार, असा सवाल उमरेड परिसरातील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी एसटीने शहरात ये-जा करीत असतात. विद्यार्थी पासेस काढून अल्पदरातील हा प्रवास शेतमजूर, शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी अत्यंत सोयीचा ठरतो. असे असले तरी अद्याप बहुतांश गावातील शालेय फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. यामुळे शाळेमध्ये जाण्याची विद्यार्थ्यांची तयारी असली तरी एसटीची सुविधाच नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांची गोची होत आहे.
उमरेड आगारातून सध्या ४६ बसेसच्या २०३ फेऱ्या सुरू आहेत. दररोज १५,०९७.८ किमीचा प्रवास या बसेसचा होतो. चालकांची संख्या ८६ असून, वाहक ८४ आहेत. यावर आगार व्यवस्थापक संजय डफरे यांच्याशी चर्चा केली असता, टप्प्याटप्प्याने एसटी बसफेऱ्या सुरू करण्याचे नियोजन आम्ही आखत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांच्या वेळापत्रकाच्या नियोजनाचा आढावासुद्धा घेतला जात असल्याचे ते बोलले. लवकरच शालेय बसफेऱ्या पूर्वपदावर आणणार असल्याची बाबही त्यांनी सांगितली.
....
या बसफेऱ्या झाल्या सुरू
उमरेड आगारातून उमरेड ते टाका, गोठणगाव (कुही), गोंडबोरी, खोलदोडा या बंद असलेल्या बससेवा सुरू केल्या असून, पचखेडी, भिवगड या मुक्कामी बसफेऱ्यासुद्धा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.