पहिली घंटा प्रवेशोत्सवाची : विद्यार्थ्यांचे होणार स्वागतनागपूर : शाळेच्या वर्गखोल्यांतील प्रत्येक कोपऱ्याची आकर्षक सजावट, प्रवेशद्वारावर मनमोहक रांगोळ्या, दरवाजांवर सुगंधितफुलांच्या माळा, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्पाने होणारे स्वागत! विद्यार्थ्यांचा पहिला दिवस स्मरणीय व्हावा आणि त्यांचा उत्साह आणखी वाढावा, याकरिता हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची तयारी शाळांतर्फे करण्यात आली आहे. गुरुवारी शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी निरनिराळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवासाठी तसेच मोठ्या सुटीनंतर मित्र-मैत्रिणी भेटणार म्हणून विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साह आहे . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवी पाठ्य़पुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी पुस्तक दिंडी आणि प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. खासगी शाळांमध्येदेखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळांना यासंदर्भातील निर्देशदेखील जारी करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,८६३ शाळा आहेत, यात १९ शासकीय, जिल्हा परिषदेच्या १,५८२, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या २८३ तर खासगी १,९७९ शाळांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)सायकल, गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप-२६ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे निर्देश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. दरवर्षीचा अनुभव विचारात घेता यंदा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळेल, असे नियोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी-पालकांची तयारी पूर्ण-दरम्यान, शाळेच्या नवीन सत्रासाठी विद्यार्थी व पालकांची तयारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. विशेषत: पहिलीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी तर उत्साह दिसून येत होता. दप्तर, वॉटरबॅग, कपडे इत्यादींची तयारी करणे सुरू होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सोडायला कोण कोण जाणार, याची चर्चादेखील अनेक घरांत रंगली होती.
शाळेचा पहिला ठोका आज
By admin | Updated: June 26, 2014 00:59 IST