लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरूच राहणार. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे शाळा बंद करण्याबाबत सध्या तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अजून तरी शहर व जिल्ह्यात कुठल्याही शाळेतील विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार समोर आलेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
अमरावती जिल्ह्यात विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने तेथील ५ वी ते ९ वीपर्यंतच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम पसरला होता. दरम्यान, नागपुरातही गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारीसुद्धा जिल्ह्यात ४८४ प्रकरण उघडकीस आले. शुक्रवारी ३१७ रुग्ण होते. यापूर्वीही ४५० रुग्णांची संख्या होती. ही परिस्थिती लक्षात घेता शाळा बंद राहील, अशी चर्चा होती.
यासंदर्भात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. पहिल्या दिवसापासूनच विभागाचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. जिल्ह्यात कुठल्याही भागात विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. जिल्हा प्रशासनही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. जर अशी कुठलीही माहिती समोर आली तर जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
बॉक्स
पालकांमध्ये भीती
शाळा सुरू झाल्यानंतर पालक हळूहळू का असेना मुलांना शाळेत पाठवू लागले होते.
परंतु गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीती पसरली आहे. ते मुलांना शाळेत पाठविण्यास मागे-पुढे पाहत आहेत. सध्या अनेक शाळांमध्ये द्वितीय घटक चाचणी परीक्षा सुरू आहे, तर काही शाळांमध्ये १५ फेब्रुवारीपासून टेस्ट सुरू होईल. अशा परिस्थितीत शाळांनी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, अशी विनंती पालकांनी शाळांकडे केली आहे.