माझ्या सार्वजनिक जीवनातील अगदी सुरुवातीच्या काळापासून माझे सहकारी असलेले ॲड. एकनाथ साळवे यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. एकनाथ साळवेंना सुमारे ११ वर्षे विधिमंडळ सदस्य म्हणून अगदी जवळून पाहता आले. तदनंतरही त्यांची साथ आणि स्नेह सतत लाभला. देशात सामाजिक ऐक्य असावे, लोकशाहीची फळे समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचावीत यासाठी परिवर्तनाचे आंदोलन उभारले. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक किसान मंचाच्या माध्यमातून ते रचनात्मक संघर्ष करीत राहिले. ते एक अतिशय विनम्र , स्वच्छ प्रतिमा असलेले पुरोगामी व प्रतिभावान सामाजिक नेते हाेते. सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख मला होत आहे. सामाजिक क्रांतीचा वसा घेतलेला विदर्भातील एक अभ्यासू आणि वैचारिक सहकारी गमावल्याचे दु:ख होत आहे.
-शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री
--------------
महात्मा गांधी यांच्या विचारांवर अढळ श्रद्धा असलेले नेतृत्व
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे यांच्या निधनामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर अढळ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
---------------------
विदर्भातील चळवळीचा नेता गमावला
ज्येष्ठ गांधीवादी व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे यांचे निधन विदर्भासाठी मोठा आघात आहे. विदर्भातील विशेषता चंद्रपूर जिल्ह्यातील एक चळवळीचा नेता आमच्यातून निघून गेला. त्यांचे गांधीवादी विचार सदैव आठवणीत राहतील.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसपुरोगामी विचारांचा अग्रणी योद्धा गमावला
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला व त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुरोगामी विचाराचा अग्रणी योद्धा अॅड. एकनाथराव साळवे यांच्या रूपाने गमावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की, त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस परिवाराचेच नुकसान झाले नाही तर पुरोगामी विचारांना आचरणात आणणारा एक अग्रणी योद्धा आम्ही गमावला आहे.
-नितीन राऊत,ऊर्जामंत्री