जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे एक वर्ष पूर्ण : विकासाचे व्हिजन हरविले नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबरला २०१४ ला पदभार स्वीकारला होता. आज त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या वर्षभरात एकाही नव्या योजनेची सुरुवात झालेली नाही. परंतु घोटाळ्यामुळे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले. सत्तापक्षात मतभेद दिसून आले. पदाधिकाऱ्यांत निर्णयक्षमतेचा अभाव असल्याने ते अधिकाऱ्यांवर विसंबून असल्याचे दिसले. सत्तापक्षाबरोबरच विरोधकांनाही आपल्या भूमिकेचा विसर पडल्याचे जाणवले. जि.प.चे अधिकारी व पदाधिकाऱ्यांबरोबरच अभ्यासू सदस्य नसल्याने जिल्ह्याच्या विकासाचे चक्र थांबल्याचे चित्र आहे.निशा सावरकर यांनी संध्या गोतमारे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर शरद डोणेकर हे उपाध्यक्ष झाले. उकेश चव्हाण शिक्षण व वित्त सभापती बनले. आशा गायकवाड कृषी, पुष्पा वाघाडे महिला व बालकल्याण तर दीपक गेडाम समाजकल्याण सभापतिपदी रुजू झाले. पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र या वर्षात कृषी विभागाचा प्लास्टिक क्रेट घोटाळा, ताडपत्री खरेदीची विवादास्पद प्रक्रिया, शिक्षण सभापतींकडून सायकल खरेदीसाठी अन्य सदस्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार तसेच गणवेश खरेदीसाठी मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्याच्या प्रयत्नाची चर्चा चांगलीच गाजली. वर्ष संपले परंतु अद्याप पदाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारातील विभागाचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे ते अधिकाऱ्यांवर विसंबून असल्याचे दिसले. कोणत्याही पदाधिकाऱ्याने वर्षभरात विभागाच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. त्यांना फक्त आपल्या सर्कलचीच चिंता असल्याचे चित्र दिसले. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असतानाही विकासाचे कार्य, योजना, सूचना, नागरिकांच्या हिताची माहिती मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यातही अपयशी ठरले. सत्तेत प्रथमच संधी मिळाल्याने महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी जि.प.मध्ये पतिराज असल्याचे चित्र निर्माण झाले. (प्रतिनिधी)सत्तापक्षातच मतभेदजिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीचे बहुमत असले तरी युतीत मतभेद दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे सदस्य अध्यक्षांच्या विरोधात असल्याचे चित्र बघायला मिळाले. पक्षातील वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे प्रदेश महासचिव श्रीकांत देशपांडे यांना बैठक घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा लागला.
घोटाळ्यांनी गाजले वर्ष
By admin | Updated: September 21, 2015 03:06 IST