पंतप्रधानांचा दौरा सुरक्षा यंत्रणा सतर्क
नरेश डोंगरे नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह नजिकच्या मध्य प्रदेशातील सिमी आणि इंडियन मुजाहिदीनचे पूर्वीचे स्लीपर, नक्षलवाद्यांच्या फं्रटल आॅर्गनायझेशनशी जुळलेले समर्थक तसेच उपद्रवी संघटनांशी जुळलेल्यांना नजरकैद करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामी लागल्या आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १४ एप्रिलला नागपुरात सुमारे ३ तास ३५ मिनिटे (प्राथमिक अंदाज) वास्तव्याला असतील. या वेळेत त्याच्याभोवतीचे सुरक्षा कवच कसे राहील, त्याची माहिती देऊन तशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचे निर्देश एसपीजीचे (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) एआयजी (सहायक महानिरीक्षक) डी. एस. मान यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. तत्पूर्वी मान यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह आज वेगवेगळ्या ठिकाणी ‘एअरसल’ (पूर्वपाहणी) केली. १४ एप्रिलला सकाळी १०.४० वाजता पंतप्रधान मोदी यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार असून, तेथून ते थेट दीक्षाभूमीला येतील. येथील भेटीनंतर कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे राष्ट्रार्पण आणि तो कार्यक्रम आटोपल्यानंतर मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित १०० व्या डिजिधन मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अर्थातच अत्यंत कडक राहणार आहे. या शिवाय, विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात आणि तेथून परत विमानतळावर येण्यापर्यंतच्या मार्गाला सील केले जाणार आहे. देशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर विविध दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. येथील विमानतळ, दीक्षाभूमी, संघ मुख्यालय आणि रेल्वेस्थानक अशी चार महत्त्वाची ठिकाणं दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. नक्षलवाद्यांचा रेड कॉरिडोरही जवळच आहे. त्यातल्या त्यात नक्षल्यांचा थिंक टँक मानला जाणारा प्रो. जी. एन. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना महिनाभरापूर्वीच न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे नक्षलवादी आणि त्यांच्या देशभरातील फ्रंटल आॅर्गनायझेशनसोबत जुळलेली मंडळी कुरापतीच्या तयारीत आहे. साईबाबाला शिक्षा सुनावल्याच्या काही तासानंतरच नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यात भीषण स्फोट घडवून सात पोलिसांचे बळी घेतले. पुन्हा ते सूड उगवण्याच्या तयारीत आहेत. विदर्भात मोठ्या प्रमाणात सिमीचे (जुने) स्लीपर आहे. तर, इंडियन मुजाहिदीनचे स्लीपर मोठ्या प्रमाणात शेजारच्या मध्य प्रदेशात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यात कसलीही गडबड होऊ नये म्हणून सुरक्षा यंत्रणा आजपासूनच कामी लागली आहे. ते सर्वच नजरकैदेत राहणार आहेत. सुरक्षेची पहिली योजना (फर्स्ट प्लॅन) आखण्यात आली. ती कशी असेल, त्याची माहिती एसपीजीच्या सहायक महानिरीक्षकांनी आज स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार, उपाययोजना राबविणे सुरू झाले आहे.