वसीम कुरैशी नागपूर :
अनेक महामार्गांना नॅशनल हायवे (एनएच) सह एशियन हायवे (एएच) करण्यात आले आहे. काही एशियन हायवेवर एनएच व एएच असे दोन्हींचे क्रमांक लिहिण्यात आले आहे. एशियन हायवे हाँगकाँग ते मास्को (रशिया) पर्यंत पसरला आहे. एएचमध्ये सार्क देशांचा सहभाग आहे. यामुळे लांबचे अंतर असल्यास वाहनचालकांना संकेतामुळे प्रवासात अडचण येत नाही. इतकेच नव्हे तर देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांच्या क्रमांकांमध्ये सुद्धा भारत सरकारने बदल केला आहे. यामध्ये शहराला लागून असलेल्या तीन महामार्गांचाही समावेश आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने नॅशनल हायवे (एनएच)च्या क्रमांकांमध्ये बदल केले आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या नंबरांमध्ये क्रमवारी नव्हती. रस्ते तयार झाले तसे नंबर देण्यात आले. परंतु सध्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या महामार्गांना पिनकोडप्रमाणे क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महामार्गांवरील वाहतूक व्यवस्था योग्य पद्धतीने चालविण्यासाठी महामार्गांना देण्यात आलेले नवीन क्रमांक सहायक ठरतील. केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या नवीन क्रमांकांच्या यादीमध्ये २१८ क्रमांक आहेत. सर्वच नवीन क्रमांकांना राष्ट्रीय महमार्गांवर लावण्यात आले आहेत.