एसटीच्या चालकांना सल्ला : एसटीच्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ
नागपूर : एसटी महामंडळाच्या दिवसाकाठी हजारो बस रस्त्यावर धावतात. अशा वेळी प्रत्येक चालकाने वाहतुकीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास डिझेलची बचत करता येते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
एसटी महामंडळाच्या इमामवाडा आगारातील प्रबोधिनी सभागृहात इंधन बचत मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा काळमेघ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन ऑईल काॅर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी पी. एन. वैद्य, क्षेत्रीय व्यवस्थापक विलास दिग्रसे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक विद्या लाखोरकर, अमित देऊळकर, एसटीच्या विभागीय वाहतूक अधीक्षक स्वाती तांबे, गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर उपस्थित होते. कार्यक्रमात पी. एन. वैद्य यांनी चालकांना वाहतुकीच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. विलास दिग्रसे यांनी टायरमधील हवा योग्य आहे की नाही हे तपासणे, क्लचचा अधिक वापर न करणे, ओव्हरस्पीड गाडी न चालविणे, डिझेलची गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. विद्या लाखोरकर, अमित देऊळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. इंधन बचत मोहीम १७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संचालन स्वाती तांबे यांनी केले. आभार अनिल आमनेरकर यांनी मानले. कार्यक्रमाला गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमाननगर आणि घाटरोड आगारातील चालक उपस्थित होते.
..............