नागपूर : नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलच्या कारभाराविरोधात अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली असून एसएनडीएलच्या कारभाराची एकूणच चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती नेमली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केले आहे. एसएनडीएल ही नागपूर शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा करणारा फ्रेन्चाईजी कंपनी आहे. कंपनीच्या एकूणच कारभाराविरोधात सुरुवातीपासूनच अनेक तक्रारी आहेत. सामान्य नागरिकांपासून तर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांतर्फे वेळोवेळी एसएनडीएल कंपनीच्या विरोधात आवाज उचलला जातो. सामान्य ग्राहकांना अवास्तव वीज बिल पाठवून लुटण्याचे काम ही फ्रेन्चाईजी कंपनी करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. शासनाने या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर या तक्रारींंमधील तथ्यांची शहानिशा करण्यासाठी एमईसीबी या सूत्रधार कंपनीने एक सत्यशोधन समितीची स्थापना केली आहे. सूत्रधार कंपनीचे संचालक राजेंद्र कुमार गोयंका हे स्वत: या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अॅड. गौरी चांद्रायण या सदस्य म्हणून काम पाहतील. ही समिती जनतेच्या सर्व प्रकारच्या तक्रारी व समस्या समजून घेऊन आपला अहवाल दोन महिन्यात सादर करेल, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
एसएनडीएलच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती
By admin | Updated: April 24, 2015 02:14 IST