भिवापूर : प्रारंभीपासूनच विविध वादांमुळे चर्चेत असलेले जवराबोडी गट ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गोंगल यांना ६१ मतांनी पायउतार व्हावे लागले. शुक्रवारी आयोजित ग्रामसभा, मतदान व मतमोजणीनंतर गटातटांच्या राजकारणात एकीकडे आनंदोत्सव, तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत गावात वाद सुरू होते. सात सदस्यसंख्या असलेल्या जवराबोडी गट ग्रामपंचायतीत अशोक गोंगल हे थेट जनतेतून सरपंचपदी आरूढ झाले. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांचा कारभार वादग्रस्त राहिला. त्यात काही स्वयंघोषित नेत्यांनी या गावातील राजकारणात उडी घेतल्याने हा वाद आणखीनच चिघळत गेला. ग्रामपंचायतीतील या वादामुळे तालुकास्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतची यंत्रणा कमालीची मेटाकुटीस आली होती. दुसरीकडे सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच गोंगल कामे करत असल्यामुळे सदस्य त्रस्त होते. दरम्यान, १९ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. या ठरावाच्या आधारे शुक्रवारी जवराबोडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात एकूण ३६९ मतांपैकी २११ मते ठरावाच्या बाजूने तर १५० मते ठरावाच्या विरोधात प्राप्त झाली, तर आठ मते अवैध ठरली. अशा प्रकारे ६१ मतांनी सरपंच अशोक गोंगल यांना पायउतार व्हावे लागले.
जणू निवडणूकच
अविश्वासावरून ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया होत असताना येथे जणू सार्वत्रिक निवडणुकीचा माहोल तयार झाला होता. काही नेते गावात मुक्कामीसुद्धा होते. साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरण्यात आली. मात्र, निकाल मिळायचा, तोच मिळाला.