खासदार विजय दर्डा : लोकमत परिवारातील सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारनागपूर : जीवनात यशस्वी आणि चांगले नागरिक होण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारही आवश्यक आहेत, असे प्रतिपादन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. लोकमत परिवारातील सदस्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सामरंभ सोमवारी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना आशीर्वादपर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. दर्डा म्हणाले की, जीवनात मिळालेले यश टिकवून ठेवणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले गुण घेतले त्यांनी तेच गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण बारावीत घेण्यासाठी आणखी परिश्रम घ्यावे लागतील. परंतु केवळ अभ्यासच आवश्यक नाही तर जीवनातील व्यावहारिक ज्ञानही आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. खेळामुळे धैर्य आणि नेतृत्वक्षमता वाढते. काही विद्यार्थ्यांना टीव्ही पाहणे आणि मोबाईलवर सोशल मीडियाशी जुळण्याची सवय असते. परंतु हे लक्षात ठेवा की, सवय व्यसन होता कामा नये. टीव्ही आणि मोबाईल फोनचा वापर केवळ आवश्यक कामांसाठीच व्हावा. तुम्ही याचे गुलाम होऊ नये. टीव्हीवरील ज्ञानवर्धक कार्यक्रम पाहण्यावर अधिक भर द्यावा. आपले आई-वडील हेच खरे शिक्षक आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काळजीपूर्वक ऐका त्या ग्रहण करा आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. घरातील मोठ्यांचा आणि समाजातील वरिष्ठांचा सन्मान करा. या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहण्यासोबतच एक चांगला नागरिक होण्यासही मदत करतील. पुढे चालून तुम्ही आपल्या आई-वडिलांचे, शहराचे आणि देशाचे नावही उज्ज्वल कराल, अशा शब्दात खासदार दर्डा यांनी पाल्यांना भविष्यात यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकमत परिवारातील सदस्यांच्या पाल्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, लोकमतचे कार्यकारी संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य यांच्यासह गुणवंत पालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षणासोबत संस्कारही आवश्यक
By admin | Updated: July 28, 2015 04:13 IST