तृतीय वर्ष वर्ग समारोपाला उपस्थिती : स्वयंसेवकांनी घातला गराडानागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपा नेते संजय जोशी यांची नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळली आहे. संघाचेदेखील त्यांच्यावरील प्रेम कायम असल्याचे प्रत्यंतर गुरुवारी रेशीमबाग मैदानात झालेल्या तृतीय वर्ष वर्ग समारोपप्रसंगी आले. विशेष म्हणजे इतके वर्ष विजनवासात असल्यानंतरदेखील त्यांना भेटण्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला व कार्यक्रम संपल्यानंतर तर त्यांना लहान-ज्येष्ठ स्वयंसेवकांनी गराडाच घातला.संजय जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानण्यात येतात. गुजरात भाजपमध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मोदी व जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. मागील वर्षी नवी दिल्ली व नागपूर येथे संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. यावरून राष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. मागील वर्षीदेखील याच कार्यक्रमासाठी संजय जोशींना निमंत्रित करण्यात आले होते हे विशेष.संजय जोशींनी संघटन उभारण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. नागपूर तसेच नवी दिल्लीसोबतच भाजप तसेच संघामध्ये राष्ट्रीय पातळीवर त्यांचे मोठ्या प्रमाणावर पाठीराखे आहेत. कुशल संघटक असलेल्या संजय जोशी यांना पक्षात सन्मानाचे पद मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समारोप कार्यक्रमाचे जोशी यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या ‘घरवापसी’ची चर्चा होत असताना समारोप कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती आणि अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनी त्यांच्याशी साधलेला संवाद यातून त्यांच्या पुनर्वसनाचे संकेत मिळत आहेत. (प्रतिनिधी)जोशींची ‘क्रेझ’ कायमकार्यक्रम सुरू होण्याच्या १५ मिनिटे अगोदरच संजय जोशी रेशीमबाग मैदानात पोहोचले. त्यांना पाहताच व्यवस्थेतील स्वयंसेवकांनी त्यांच्याकडे धाव घेतली व बसण्यासाठी समोरच्या रांगेत जागा दिली. कार्यक्रम संपल्यानंतर संघ शिक्षा वर्गातील अनेक स्वयंसेवक तसेच संघ परिवारातील विविध संस्थांतील सदस्य, पदाधिकारी जोशी यांच्याभोवती गोळा झाले व त्यांच्याशी संवाद साधला. बऱ्याच वेळ ते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
संजय जोशींवर संघाचा स्नेह कायम
By admin | Updated: June 10, 2016 03:05 IST