नागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे कामठीतील संजय ज्वेलर्सला जोरदार चपराक बसली. मनीष कनोजिया असे ग्राहकाचे नाव असून ते सदर येथील रहिवासी आहेत.
कनोजिया यांचे आवर्ती ठेवीतील १ लाख ३० हजार रुपये व मुदत ठेवीतील १ लाख रुपये परत करण्यात यावे, १ लाख ३० हजार रुपयांवर २१ एप्रिल २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १९ टक्के व्याज अदा करावे आणि १ लाख रुपयांवर १९ एप्रिल २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत दरमहा १६०० रुपये द्यावे, असे आदेश आयोगाने संजय ज्वेलर्सला दिले आहेत. तसेच कनोजिया यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कम संजय ज्वेलर्सनेच द्यायची आहे. या आदेशांच्या अंमलबजावणीकरिता संजय ज्वेलर्सला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी कनोजिया यांची तक्रार निकाली काढली. तक्रारीतील माहितीनुसार, कनोजिया यांनी संजय ज्वेलर्सच्या १२ महिन्याच्या आवर्ती बचत योजनेमध्ये २१ एप्रिल २०१८ ते १९ मार्च २०१९ पर्यंत दरमहा १० हजार याप्रमाणे एकूण १ लाख २० हजार रुपये जमा केले. संजय ज्वेलर्स या रकमेवर १० हजार रुपये व्याज जोडून एकूण रकमेचे दागिने कनोजिया यांना देणार होते. परंतु, संजय ज्वेलर्सने कनोजिया यांना दागिने दिले नाहीत. याशिवाय कनोजिया यांनी संजय ज्वेलर्सकडे २१ एप्रिल २०१८ रोजी १ लाख रुपयांची मुदत ठेव केली होती. त्यावर दरमहा १६०० रुपये व्याज कबूल करण्यात आले होते. परंतु, १७ मार्च २०१९ पासून ते व्याज देणे बंद करण्यात आले. त्यासंदर्भात कनोजिया यांनी संजय ज्वेलर्ससोबत पत्रव्यवहार केला, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, कनोजिया यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.
------------------
तक्रारीवर एकतर्फी कारवाई
आयोगाने कनोजिया यांच्या तक्रारीवरून संजय ज्वेलर्सला नोटीस बजावली होती. ती नोटीस तामील होऊनही ते आयोगासमक्ष हजर झाले नाहीत किंवा तक्रारीवर लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कारवाई केली व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून संजय ज्वेलर्सला सदर आदेश दिले.