अभय लांजेवार/लोकमत विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून सुमारे सात वर्षांपूर्वी आलेल्या दोन तरुणांनी हातगाडीवर कुल्फी विक्रीचा धंदा सुरू केला. कालांतराने बनारसी लस्सी आणि ज्यूस विक्रीच्या व्यवसायात घामही गाळला. क्षणात विलक्षण व मोठी स्वप्ने रंगविणाऱ्या दोघांनाही ‘ठंडा ठंडा-कूल कूल’च्या व्यवसायात मिळकत कमी होती. अशातच दोघांनीही सुगंधित बनावटी तंबाखूच्या गोरखधंद्याचा वाममार्ग निवडला. आबालवृद्ध, महिला अन् तरुणाईला पोखरून काढणाऱ्या या दोन नंबरी धंद्यातून दोघेही तरुण करोडपती झालेत. अल्पावधीतच साऱ्या भौतिक सुविधांचा उपभोग घेणाऱ्या आणि गडगंज संपत्तीत लोळणाऱ्या दोघांपैकी सध्या एकाला तंबाखू तस्करीच्या गुन्ह्यात जेलची हवा खावी लागली. दुसरा आरोपी पोलीस यंत्रणेला ‘मामा’ बनवून पसार झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ येथील गोदामात तसेच एका घरातून ६ लाख ३३ हजार ५७३ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू नुकताच जप्त केला. या अवैध प्रकरणात उमरेडच्या दोन तरुणांचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे येत आहे. हे दोन्ही तरुण मूळ उमरेड येथील रहिवासी नाहीत, तर ते अन्य राज्यातून या ठिकाणी आले आहेत. ड्रीम सिटी, उमरेड येथे दोघांचेही आलिशान बंगले असल्याचे समजते.
मध्य प्रदेश येथील गिरजेश ऊर्फ अजय बंसल (३५, रा. ग्वालियर) आणि उत्तर प्रदेशातील अर्जुन हरिश्चंद्र कटारिया (२९, रा. कानपूर) हे दोघे सात वर्षांपूर्वी कुल्फी, लस्सी आणि ज्यूस विक्रीचा धंदा करीत होते. त्यानंतर तंबाखूच्या तस्करीमध्ये काेट्यावधींची ‘माया’ मिळवत ते या क्षेत्रातील किंगमेकर बनले, शिवाय परिसरातील गोरगरीब तरुणांना हाताशी घेत, त्यांना या धंद्यात ओढत असंख्य तरुणांचे जाळे विणले होते. अतिशय घातक आणि कमी रकमेचा सुगंधित तंबाखू ट्रकच्या माध्यमातून परिसरात उतरवायचा आणि त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने ब्रॅण्डेड तंबाखूच्या पॅकेटमध्ये हुबेहुब पॅकिंग करीत सर्वदूर विक्रीसाठी पाठवायचा, असा हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून या परिसरात चांगलाच फोफावला आहे.
आरोपी अर्जुन कटारिया तर असंख्य तरुणांच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्याच्या लाडीक, प्रेमळ स्वभावावर तरुणाई फिदा होती. अखेरीस उशिरा का होईना, या दोघांच्याही गोरखधंद्याचे बिंग फुटले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कारवाईने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
....
शोध कारखान्यांचा...
यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरेड बुधवारीपेठ येथे धाड टाकत सुगंधित तंबाखू तयार करण्याच्या कारखान्याची पाळेमुळे उकरून काढत एकास अटक केली होती. आता मांढळ येथील कारवाईत बरेच घबाड उघडकीस आले आहे. उमरेड, भिवापूर, कुही परिसरात तंबाखू तयार करण्याचा कारखाना आहे काय, याचा कसून शोध घेतला जात आहे.
....
विदर्भात सर्वदूर
मध्य प्रदेशातून कमी भावात ट्रकच्या माध्यमातून तंबाखूची तस्करी सुरू होती. पद्धतशीर पॅकिंग करीत गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, भिसी, चिमूर, भिवापूर, कुही आणि नागपूर जिल्हा ग्रामीणच्या संपूर्ण परिसरात हा माल विकला जातो. या गोरखधंद्यात मोठे रॅकेटच या भागात असून, पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे हा अवैध धंदा चांगलाच बोकाळला आहे. शांत, संयमी नगरी म्हणून उमरेडची आगळी ओळख आहे. अशातच तंबाखू, दारू आणि गांजा तस्करीचे हे केंद्र ठरू नये आणि या नगरीला कोणतेही गालबोट लागू नये, असा सूर उमटत आहे.