सुनील चरपे
नागपूर : मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात कापसाच्या दरात ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा चढ-उतार दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारात रुईचे दर एक डाॅलर प्रतिपाउंडच्या आसपास असून, देशांतर्गत बाजारात सरकीचे दर ३७ ते ३८ रुपये प्रतिकिलाे आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने कापसाला किमान ८,८०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळत आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी दिली.
मागील हंगामात कापसाचे दर ११ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पाेहाेचले हाेते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर १ डाॅलर ७० सेंट प्रतिपाउंडपर्यंत वधारले हाेते. त्यावेळी एक लाख रुपये प्रतिखंडी रुईचे दर हाेते. शिवाय, डाॅलरचे मूल्यही ८० रुपये हाेते.
चालू हंगामाच्या सुरुवातीला हे दर १ डाॅलर २० सेंट प्रतिपाउंडवर स्थिरावत शुक्रवारी (दि. २) ९८ सेंट प्रतिपाउंडपर्यंत खाली आले आहेत. त्यातच डाॅलरचे मूल्य ८२ रुपयांवर पाेहाेचले आहे. त्यातच रुईचे दर ६५ ते ६७ हजार रुपये प्रतिखंडीवर आले आहेत. सरकीचे दर ४० रुपये प्रतिकिलाेवरून ३७ ते ३८ रुपये प्रतिकिलाेवर आले आहेत. मात्र, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने कापसाला ८,८०० रुपये प्रतिक्विंटल व त्यापेक्षा अधिक दर मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची आशा असली तरी जागतिक बाजारात कापसाचे दर १ डाॅलर ५० सेंट प्रतिपाउंडपेक्षा अधिक झाल्यास शेतकऱ्यांना १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू शकताे. जागतिक पातळीवर या दरवाढीची शक्यता सध्यातरी कमी आहे, असेही विजय जावंधिया यांनी सांगितले.
आयात शुल्क व निर्यात सबसिडी
सध्या जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात कापसाचे प्रतिक्विंटल दर ८०० ते १,१०० रुपयांनी अधिक आहे. केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केला आहे. हा आयात शुल्क पूर्ववत करावा व निर्यातीला प्राेत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते मधुसूदन हरणे यांनी केली असून, कापसाच्या निर्यातीला साखरेप्रमाणे सबसिडी देण्याची मागणी विजय जावंधिया व कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गाेविंद वैराळे यांनी केली आहे.
रुईची ‘एमएसपी’ जाहीर करावी
जागतिक बाजारात कापसाचे दर रुईच्या दरावर ठरतात. त्यामुळे केंद्र सरकार कापसाऐवजी रुईची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) जाहीर करावी. ही एमएसपी जागतिक बाजारातील रुईच्या दरापेक्षा किमान ५० टक्के अधिक असावी. जागतिक बाजारात भारताचे स्थान टिकवून ठेवत ते पक्के करण्यासाठी कापसाची नियमित निर्यात करावी. त्यासाठी दरवर्षी विशिष्ट काेटा ठरवून द्यावा, विजय जावंधिया यांच्यासह इतरांनी केली आहे.
कापसाच्या दराचा हिशेब
१०० सेंट म्हणजे १ डाॅलर. २.२ पाउंड म्हणजे १ किलाे. आजचा रुईचा दर ०.९८ डाॅलर. ८२ रुपयांचा एक डाॅलर प्रमाणे एक किलाे रुईचा दर १७७ रुपये. एक क्विंटल कापसापासून ३५ किलाे रुई मिळते. त्यामुळे रुईचा दर ६,१८७ रुपये हाेताे. एक क्विंटल कापसापासून ६४ किलाे सरकी मिळत असून, सध्या सरकीचे दर ३८ रुपये प्रतिकिलाे असल्याने हा २,४३२ रुपये हाेताे. रुई व सरकीचे दर एकत्र केल्यास एक क्विंटल कापसाचा दर ८,६१९ रुपये हाेताे.