‘महामायक्रोकॉन-२०१४ परिषदे’चे उद्घाटन : ३२० तज्ज्ञांचा समावेशनागपूर : मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्म जीवशास्त्र) हा वैद्यकीय चिकित्सकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रुग्णाला प्रतिजैविक (अॅन्टिबायोटिक्स) देताना मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांची आवश्यकता भासते. अतिदक्षता विभागामध्ये मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे विचार कराडच्या क्रिष्णा आॅफ मेडिकल सायन्स विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे व्यक्त केले.इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीच्या वतीने २० वी महाराष्ट्र चॅप्टर कॉन्फरन्स ‘महामायक्रोकॉन-२०१४’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा नारंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजाराम पोवार उपस्थित होते. मंचावर महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. ए.के. सहानी, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. यज्ञेश ठाकर, डॉ. सी.एन. चौधरी व विदर्भ असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना दाते उपस्थित होत्या.डॉ. मिश्रा म्हणाले, अशा परिषदेतून नवनवीन संशोधन पुढे येणे आवश्यक आहे. अशा परिषदेतून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. नारंग यांनी वैद्यकीय क्षेत्रातील स्त्रियांच्या नेतृत्व क्षमतेविषयी भाष्य केले. डॉ. पोवार म्हणाले, अशा परिषदेतून विचारांची देवाण-घेवाण होते. अनेक गोष्टी नव्याने कळतात. याचा समाजाला फायदा होतो. संचालन डॉ. मीना मिश्रा यांनी केले तर आभार डॉ. कल्पना दाते यांनी मानले. उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात डॉ. साहनी व डॉ. कुलकर्णी यांनी नवीन तंत्रज्ञान ‘मॉल्डी-टॉफ’ याविषयी माहिती दिली. या परिषदेला राज्यातून ३२० तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. सुनंदा श्रीखंडे, डॉ. संध्या सावजी, डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. सरफराज, डॉ. सचिन देवकर, डॉ. स्वाती भिसे व डॉ. माधवी देशमुख आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची
By admin | Updated: September 21, 2014 01:15 IST