नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दीर्घकालीन व अल्पकालीन असे दोन आराखडे तयार करण्याचे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत न्यायालयाने शासनाला विचारणा केली आहे. या संदर्भात रविवारी स्वाधिन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, परिवहन विभाग आणि महसूल विभागाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन आराखडा तयार करून त्यानुसार सर्वसंबंधित विभागानी काम करावे, अशा सूचना क्षत्रिय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत स्टारबससाठी मोरभवनची, कृषी विभागाची जागा महापालिकेला द्यावी व लकडगंज आणि हनुमाननगर येथील एनआयटीची जागाही महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी करण्यात आली. या दोन्ही जागांचा ताबा महापालिकेने घ्यावा, अशा सचना क्षत्रिय यांनी केल्या. मध्यवर्ती बसस्थानक तसेच भंडारा, अमरावती व वर्धा मार्गावर बसेस उभ्या राहात असल्याने वाहतुकीची कोंडी होते, याकडे बैठकीत संबंधित खात्याचे लक्ष वेधण्यात आले.महापालिकेने येथे वाहतनळासाठी जागा द्यावी व याचा अहवाल सरकारकडे पाठवावा, असे क्षत्रिय यांनी सांगितले.बैठकीला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के.के. पाठक, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आराखडे
By admin | Updated: February 23, 2015 02:27 IST