रियाज अहमद
नागपूर : कोरोनाच्या या कठीण काळात माणुसकी हरवल्याचा वार्ता ऐकायला मिळतात; पण अशातही काही घटना आशादायी ठरतात. ज्या समाज, मानवतेसाठी पोषक ठरतात. अशीच एक सकारात्मक आणि समाधान देणारी घटना शनिवारी नागपुरात घडली.
कामठी रोडवर एका खाजगी रुग्णालयात भरती असलेले गोपाल तायडे यांना प्लाझ्माची गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यासाठी अनेक लोकांशी संपर्क केला. रुग्णाच्या कुटुंबीयातील चकोले यांचा कामठी येथील रहिवासी कामराम जाफरी यांच्याशी संपर्क झाला. कामरान हे कामठीमध्ये अली ग्रुप या संस्थेच्या नावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. कामरानने तीन प्लाझ्मा डोनरशी संपर्क केला. यातील दोन उपलब्ध नव्हते. मात्र, कामठीतील हैदर चौक येथील रिजवान हैदर याच्याशी संपर्क झाला. रिजवानचा रोजा होता. मात्र, रुग्णाला गरज असल्याचे सांगताच त्याने तात्काळ होकार दिला. दरम्यान, रिजवानची तपासणी करण्यात आली. त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्याची पुष्टी झाली.
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. महिनाभर मुस्लीम बांधव रोजा ठेवतात. शनिवारी रिजवानने रोजा ठेवला होता; परंतु गोपालला प्लाझ्माची आवश्यकता असल्याने रिजवानने रोजा तोडून प्लाझ्मा डोनेट केला.
- कोरोनाचे संकट अख्ख्या जगावर कोसळले आहे. अशा बिकट परिस्थितीतही लोकांना वाचविण्याचे काम सुरू आहे. रमजान महिन्यात केलेले चांगले काम हे पुण्याचे असते. अल्लाहने एका गरजवंताचा जीव वाचविण्यासाठी माझी निवड केली. इस्लाम आम्हाला माणुसकी शिकवितो.
रिजवान हैदर