नागपूर : उमेदवाराला निवडणूक अर्जासोबत शपथपत्र भरून द्यावे लागते. त्यात त्याची मालमत्ता, शिक्षण व दाखल असलेल्या गुन्ह्यांचे विवरण उमेदवाराला नमूद करावे लागते. या शपथपत्राची एक प्रत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर नागरिकांना पाहण्यासाठी टांगली जाते. त्यामुळे उमेदवाराची पार्श्वभूमी काय आहे, हे सामान्य मतदाराला कळत नाही. आता निवडणूक आयोगाने उमेदवाराने शपथपत्रात दिलेली सर्व माहिती मतदान केंद्रावर जाहीरपणे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांना आपला उमेदवार किती शिक्षित आहे, त्याच्याकडे किती मालमत्ता आहे, कोणकोणते गुन्हे दाखल आहे, याची इत्थंभूत माहिती मिळेल. आयोगाच्या या निर्णयामुळे गुन्हेगारीच्या बळावर राजकारणात शिरू पाहणाऱ्यांना चाप बसला आहे. तसेच बाहुबलींना तिकीट देऊन पक्षाच्या जागा निवडून आणण्याचे बेत आखणाऱ्या राजकीय पक्षांचेही मनसुबे उधळले गेले आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या. सर्व पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले. सोबतच सामाजिक, राजकीय, लोकहिताच्या प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यांना यातून वगळण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
राजकीय गुन्हेगारीला चाप उमेदवारांचा वाढला ताप
By admin | Updated: December 22, 2016 02:38 IST