शाळकरी मुलांना ‘ईव्हीएम’चे धडे : भविष्यातील आधारस्तंभांना लोकशाहीची ओळखनागपूर : निवडणुकांदरम्यान घरातील सदस्यांचा बघितलेला उत्साह...बाबा-आजोबांची रंगलेली चर्चा, आई-मामीची ‘ईव्हीएम’बाबत प्रश्नोत्तरे अन् ताई-दादाने मतदान केल्यानंतर काढलेले ‘सेल्फी’ फोटो...‘टीव्ही’पासून ते वर्तमानपत्रांपर्यंत जागोजागी‘ईव्हीएम’ मतदानाचे आवाहन...अनेक घरांतील लहानग्यांच्या मनात मतदानाबद्दल ‘क्रेझ’ होती अन् उत्सुकतादेखील. काहींनी तर मतदान करण्याचा हट्टदेखील धरला होता, पण बापड्यांचे लहान वय आडवे आले अन् पुढील काही वर्षे यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, हे ऐकून ते खट्टू झाले. परंतु सोमवारी ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनतर्फे संचालित करण्यात येणाऱ्या मुंडले इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ ‘ईव्हीएम’ पाहण्याचीच नव्हे तर निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करण्याचीदेखील संधी मिळाली. हाताच्या बोटावर मतदान केल्यानंतर उमटलेली शाईची खूण एकमेकांना दाखवत असताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हे चित्र ज्यांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले त्यांना येणाऱ्या काळात देशातील लोकशाही प्रणाली नक्कीच आणखी बळकट होणार असा विश्वास बसला. शाळेतील ‘हेड गर्ल’ आणि ‘हेड बॉय’ची निवड करणे हे तसे जिकिरीचे काम असते. त्यामुळे बी.आर.ए.मुंडले शाळेत गेल्या काही वर्षांपासून निवडणूक पद्धतीनेच ‘हेड गर्ल’ आणि ‘हेड बॉय’ निवडण्यात येतात. दरवर्षी ‘बॅलेट पेपर’ पद्धतीने निवडणूक व्हायची. परंतु तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनादेखील निवडणूक प्रक्रियेची नेमकी ओळख व्हावी, या उद्देशातून मतदानासाठी ‘ईव्हीएम’चा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी मतदानानंतर १६ उमेदवारांमधून ‘हेड बॉय’ अन् ‘हेड गर्ल’ निवडण्यात आले.(प्रतिनिधी)
चिमुकल्यांनी बजावला मतदानाचा हक्क
By admin | Updated: July 22, 2014 00:59 IST